नवी मुंबई: राज्यातील अनेक शहरात औरंगजेब उदात्तीकरण करणारे स्टेटस समाज माध्यमात ठेवल्याने शांतता भंग झाल्याच्या घटना घडत असताना आता जातीय दंगलीचा इतिहास नसलेल्या नवी मुंबईतही हा प्रकार समोर आला आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या एका दुकानात काम करणाऱ्या तीस ते बत्तीस वर्षीय युवकाने औरंगजेबचा फोटो असलेले स्टेटस ठेवत त्याचे उद्दात्तीकरण करणारा मजकूर ठेवला होता. हे लक्षात येताच त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, शिव शंभो प्रतिष्ठान, तसेच हिंदू सकळ समाज संघटना तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संध्याकाळी सात वाजल्या पासून जमा होऊ लागले. त्यात या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. सुरवातीला हि बाब लक्षात आल्या नंतर हिंदू संघटनांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेतला व त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. असा दावा करण्यात आला आहे. या बाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि एका युवकाची चौकशी सुरु असून सध्या पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले आहे. चौकशी नंतर त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.