परदेश प्रवास न केलेल्या दोघांना लागण, दैनंदिन करोना रुग्ण २६६ पर्यंत

नवी मुंबई :  शहरात ‘ओमायक्रॉन’चे बुधवापर्यंत चार रुग्ण आढळले होते.  मात्र गुरुवारी आणखी दोन रुग्ण आढळले असून त्यांना  परदेश प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे शहरात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाचा धोका पालिका प्रशासनाने वर्तवला असून शहराची चिंता वाढली आहे. याबरोबरच गुरुवारी करोनाच्या नव्या रुग्णांत मोठी वाढ झाली असून बुधवारच्या १६५ रुग्णांवरून ती २६६ पर्यंत गेली आहे. नवे रुग्ण हे नेरुळ सेक्टर १० व घणसोली सेक्टर  ५ येथील असून ते राहत असलेल्या वसाहती पालिका प्रशासनाने प्रतिबंधीत केल्या आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे या दोन्ही रुग्णांचा शोध बुधवारी रात्रीपासून पालिका प्रशासन घेत होती. यातील एक रुग्ण सांगली जिल्ह्यत पोहचला आहे तर दुसऱ्या रुग्णाला

रात्री उशिरापर्यंत  रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नव्हते. यावर पालिका आयुक्तांनी नेरुळ येथील रुग्णाची विधानभवन येथे चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे त्याबाबत आंम्हाला माहिती नव्हते, असे सांगितल आहे. करोनाची शहरातील परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे.  दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारी १६५ रुग्णापर्यंत गेली होती. त्यात गुरुवारी शंभर रुग्णांची एकाच दिवसात भर पडली असून २६६ पर्यंत गेली आहे. करोना रुग्णवाढीचा हा आलेख प्रचंड वेगाने वाढत असून नवी मुंबई ठाणे जिल्ह्यत सर्वाधिक गतीने रुग्ण वाढत आहेत. यामुळे शहराचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी सकाळी समाजमाध्यमांतून नवी मुंबईकरांना मार्गदर्शन करीत नागरिकांकडून होत असलेल्या बेफिकिरीबाबत नाराजी व्यक्त केली. या दोघांनी  परदेश प्रवास केलेला नसल्याने चिंतेत भर पडली आहे. या दोघांच्या करोना  चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ते सकारात्मक आढळले होते. सिटी स्कॅन स्कोअर जास्त आल्याने त्यांची पुढील चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात ते ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत.

‘ओमायक्रॉन’बाधित सांगलीत

नेरुळ येथील ओमायक्रॉन बाधित रुग्ण हा विधानभवनात शिपाई असून तो एका  खासगी वाहनाने सांगलीत पोहोचला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाने दिली. तर पालिका प्रशासनाने कुटुंबातील त्याच्या  संपर्कात आलेल्या पाच सदस्यांना सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.  संशयित रुग्णांनी करोनाचे वाहक  बनण्यापेक्षा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय शहराबाहेर पडू नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आरोग्य व्यवस्था टप्प्याटप्प्याने खुली

सध्या नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील रुग्ण सहाशेपेक्षा अधिक झाल्यावर प्रशासन वाशीतील निर्यात भवन येथील काळजी केंद्र खुलेकरणारआहे. त्यानंतर बेलापूर येथील मयूरेश व तुर्भेतील राधाकृष्ण ही काळजी केंद्रे गरजेनुसार सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

दोन दिवसांत ४३१ रुग्ण

  • नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन दिवसांत करोनाचे ४३१ नवे रुग्ण वाढले आहेत. बुधवारी १६५ तर गुरुवारी २६६ रुग्ण सापडले आहेत.
  • नव्या रुग्णांमुळे

नवी मुंबईत करोनाबाधितांची एकूण संख्या १,१०,८२९ इतकी झाली आहे. गुरुवारी शहरात करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, मात्र आतापर्यंत १९६९ करोना मृत्यू झाले आहेत.

  • १८ जण गुरुवारी करोनामुक्त झाले आहेत. मात्र शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत असून ती ९३६ पर्यंत गेली आहे.
  • ही संख्या अशाच वेगाने वाढल्यास शहरात पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात झपाटय़ाने रुग्ण वाढत आहे. शहराचा धोका मोठय़ा  प्रमाणात  वाढत असून गुरुवारी दोन नवे ओमायक्रॉनबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांनी परदेश प्रवास केलेला नसताना संसर्ग झाल्याने समूह संसर्गाची भीती आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

अभिजित बांगर, आयुक्त नवी मुंबई, महापालिका