भक्तांचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या गणरायाचे आगमन सोमवारी नवी मुंबईत घरोघरी झाले. यंदा गणरायाचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. अनेकांनी डॉल्बीसारख्या दणदणाटी संगीताचा वापर न करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. सोमवारी मोठय़ा थाटात मखरात विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणेशाचे मंगळवारी विसर्जन झाले. या वेळी विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, यावर नवी मुंबईकरांचे कटाक्षाने लक्ष होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास मुहूर्त असल्याने शहरात अनेकांच्या घरी मंत्रघोषात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळच्या आरतीनंतर भक्तिगीतांच्या गजरात वातावरण मंगलमय होऊन गेले.

दुपारनंतर अनेकांच्या घरी दर्शनासाठी नातेवाईकांची ये-जा सुरू होती. नवी मुंबई, पनवेल, नवीन पनवेल आणि मुंबई तसेच कल्याण व डोंबिवलीत राहत असलेल्या कुटुंबातील सदस्य घरातील ‘एक गणपती’चे दर्शन घेण्यासाठी सकाळी घराबाहेर पडले होते.

उरणमध्ये १२०० मूर्तीचे विसर्जन

उरण : उरण तालुक्यात दीड दिवसांच्या १२०० घरगुती गणपतींचे विसर्जन करून त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगरपालिका, पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. या वर्षी एकूण ७५०० घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली, तर १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना केली. विसर्जनाच्या दिवशी शहरातील विमला तलाव येथे विसर्जनाच्या कालावधीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तलावातील विसर्जनासाठी सुरक्षारक्षकांसह बोटीचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. गणेशभक्तांना मिरवणूकीने जाऊन विसर्जन करता यावे याकरिता वाहतूक विभागाकडून मार्गाची निश्चिती करण्यात आल्याने विसर्जन नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and half day ganesh immersion in navi mumbai
First published on: 07-09-2016 at 02:17 IST