नवी मुंबई : मतदार यादीतील बोगस आणि दुबार नावे वगळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी एकत्र आल्या आहेत. मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असून, शिवसेना उबाठा गट आणि मनसेने कंबर कसली आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष टीशर्ट तयार करण्यात आले असून, अमित ठाकरेंनी याचे नुकतेच अनावर केले आहे. या मोर्चातून केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट जाब विचारला जाणार आहे. मनसेची मोर्च्यासाठीची तयारी पाहता या मोर्च्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे.

हा मोर्चा मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातून निघणार असून, विरोधकांचा उद्देश मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि मतचोरीच्या प्रयत्नांकडे आयोगाचे लक्ष वेधणे हा आहे. मनसेने या मोर्चासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी मनसेकडून राज्यभर जोरदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 नवी मुंबईतही मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून ‘सत्याचा मोर्चा’साठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. वाशी रेल्वे स्थानक आणि पाम बीच रोड परिसरात प्रवाशांना पत्रके वाटून नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीतील बोगस नावे आणि पत्त्यांतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर मनसेने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान, या विराट मोर्चासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ या विशेष टी-शर्टचे अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजगड कार्यालयात झालेल्या या अनावरण सोहळ्याला नवी मुंबई मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेने निवडणूक आयोगाकडे पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली आहे. “खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांची लढाई” या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.