दिवाळीपर्यंत रुग्णालये सुरू; नेरूळ, ऐरोलीत १०० खाटांची सेवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्सिजन वाहिनी, डॉक्टर, नर्सेसची कमतरता आणि काही वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता यामुळे गेली पाच वर्षे बांधून तयार असलेली नेरूळ व ऐरोली येथील प्रत्येकी १०० खाटांची रुग्णालये सुरू होणार आहेत. पालिकेच्या वतीने २२० प्रशिक्षित नर्सेसची ऑनलाइन नोकरभरती सुरू असून ४६ डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात केवळ बाह्य़रुग्ण विभागावर चालणारी ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. ही रुग्णालये सुरू झाल्याने पालिकेच्या वाशी येथील मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार आहे.

नवी मुंबई पालिकेने चतुर्थस्तरीय आरोग्य सेवा उभारली आहे. यात २१ नागरी आरोग्य केंद्रे, तीन माता बाल रुग्णालये असून यातील ऐरोली व नेरूळ येथील माता बाल रुग्णालयांचा बदल १०० खाटांच्या प्राथमिक रुग्णालयात करण्यात आला आहे. सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून ती बांधण्यात आली, मात्र रुग्णालयात लागणारी वाहिन्याद्वारे ऑक्सिजन पुरवठा तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे ती असून नसल्यासारखी होती. मध्यंतरी राजकीय कुरघोडीमुळे या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने नंतर काही वैद्यकीय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी एकतर ऑक्सिजन वाहिन्याची नितांत गरज होती. या सुविधांच्या निविदा प्रक्रियेत गेली चार ते पाच वर्षे लपंडाव सुरू आहे. अखेर आता गॅसवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून नेरूळ येथे वाहिनी टाकण्यात आली आहे. याच वेळी रुग्णालयासाठी लागणारा डॉक्टर व्यतिरिक्त कर्मचारी नर्सेस, ब्रदर्स आणि डॉक्टरांची भरती सुरू आहे. सर्व रुग्णालयासाठी लागणाऱ्या २२० नर्सेस भरती सुरू असून ती या महिनाअखेर पूर्ण होणार आहे.

नव्याने ४० डॉक्टर सेवेत दाखल

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य दिले असून ४६ डॉक्टरांची नव्याने भरती केली आहे. त्यातील ४० जणांना सेवेत दाखल करून घेण्यात आले असून आणखी काही फिजिशियन व सर्जन डॉक्टरांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. पुढील वर्षांपर्यंत पूर्ण वेळ पालिका सेवेत राहणाऱ्या १०० डॉक्टरांची सेवा घेतली जाणार आहे.

काही तांत्रिक कारणामुळे ऐरोली व नेरूळ येथील रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब लागला. पण आता नर्सेस आणि डॉक्टरांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने लवकरच दोन्ही रुग्णालये सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे.    – डॉ. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxygen for hospitals
First published on: 16-10-2018 at 02:33 IST