पनवेल : पनवेल शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये दोन ठिकाणी ७९ वा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. याशिवाय शहरासह तालुक्यातील विविध शाळा आणि पोलीस ठाण्यांमध्येही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या पावसाच्या संततधार नंतरही देशभक्तीचा उत्साह अनेकांच्या चेह-यावर दिसत होता. पनवेल तहसील कचेरीमध्ये, कारभार सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी पहिल्यांदा अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच पनवेल महापालिका मुख्यालयाशेजारील छत्रपती संभाजी महाराज मैदानात, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ध्वजारोहण झाले.गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे, पूर्वतयारी असूनही मैदानात मातीचा चिखल झाल्याने यंदा ध्वजारोहणानंतर परेड आयोजित करता आली नाही.
कार्यक्रमाला भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य आ. विक्रांत पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, स्वरूप खारगे, रविंद्रकुमार घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, विविध विभागप्रमुख, शिक्षक, सुरक्षा विभागाचे जवान, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बल व रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे वार्डन, तसेच माजी नगरसेवक प्रितम म्हात्रे, संदीप पाटील, चारुशिला घरत, शिवसेनेचे रामदास शेवाळे, पालिका शाळेतील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्य चळवळीत पनवेलचे योगदान
पनवेल ही स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांची भूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१८ साली लोकमान्य टिळक आणि १९२७ साली महात्मा गांधी यांच्या सभा येथे झाल्या होत्या. १९०७ पासून राष्ट्रचळवळीतील सविनय कायदेभंग, चिरनेर जंगल सत्याग्रह, मिठाग्रह, ‘भारत छोडो’ आंदोलन अशा विविध लढ्यांमध्ये पनवेलकरांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पनवेलच्या तरुणांनी धाडस आणि शौर्याचे दर्शन घडवले. गोवा मुक्ती आंदोलनात पनवेलहून गेलेल्या तुकडीचे नेतृत्व करणारे हिरवे गुरुजी हुतात्मा झाले, ही नोंद इतिहासात आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे देखील याच भूमीचे होते.