पनवेल : पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे चोरट्यांची दहशत पनवेलमध्ये वाढल्याचे चित्र आहे. रस्त्यावरून पायी चालणा-या महिलांच्या गळ्यातील दागीने लुटणे, वाहनचालकाला गुंगीचे औषध पाजून लुटणे आणि जेष्ठ नागरिकाचे दागीने भर रस्त्यात पोलीस असल्याची बतावणी करून लुटणे हे सर्व प्रकार रस्त्यावरील गुन्हेगारी पनवेलमध्ये वाढल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हेतर चोरट्यांनी पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून सव्वा लाख रुपयांचे विविध शैक्षणिक साहीत्य चोरी करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही बाधा आणली आहे. पनवेल परिसरातील पोलिसांची चोरट्यांवरील वचक कमी झाल्याने चोरट्यांची दहशत वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
रस्त्यावरील गुन्हेगारी वाढल्याचे पहिले उदाहरण हे करंजाडे येथील आहे. करंजाडे वसाहतीमध्ये १६ सप्टेंबरला सव्वा अकरा वाजण्याच्या सूमारास करंजाडे सेक्टर २ मध्ये राहणा-या ५४ वर्षीय महिला या जिल्हापरिषदेच्या शाळेसमोरील रस्त्यावरून पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यासाठी गळ्यात हात टाकून सोनसाखळी ओढून तेथून दुचाकीवरून पळ काढला. या घटनेत ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरी झाली. तसेच दूसरी घटना दूस-या दिवशी पनवेल शहरातील साईनगर येथे राहणा-या ६३ वर्षीय जेष्ठ महिला या सहस्त्रबुद्धे रुग्णालयाशेजारील मार्गावरून पायी चालत असताना रात्री साडेआठच्या सूमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या मानेला हिसका देऊन १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र लुटून घेऊन गेले. या दोन्ही घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
रस्त्यावर लुटण्याची तीसरी घटना २० सप्टेंबरला सकाळी पावणेअकरा वाजता नवीन पनवेल येथील सेक्टर ४ मधील डीमार्ट ते क्रेडीट सोसायटी या दरम्यानच्या रस्त्यावर घडली. रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले ६८ वर्षीय व्यक्ती हे त्यांच्या मित्राला काजु देण्यासाठी रस्त्यावरून चालत जात होते. अचानक पायी चालणा-या जेष्ठ नागरिकाला रस्त्यावर थांबविण्यात आले. स्वताची ओळख पोलीस असल्याचे सांगून दोन व्यक्तीने शेजारी चो-या होत असल्याने तूमचे दागीने सूरक्षित काढून ठेवण्याचा सल्ला या जेष्ठ नागरिकाला देऊन दागीने सूरक्षित पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून ९८ हजार रुपयांच्या दागीन्यांची लूट केली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चौथी घटना २१ सप्टेंबर (रविवारी) दुपारी साडेबारा वाजता घडली. पनवेल येथील राज्य परिवहन आगारासमोर ६५ वर्षीय इको चालकाला पनवेल ते कळंबोली येथे जाऊन परतीचे भाडे देऊ असे ठरवून एका प्रवाशाने इको व्हॅन बूकींग केली. ठरल्याप्रमाणे कळंबोली येथे आल्यावर जुन्या आरटीओ कार्यालयाशेजारी आर.आर. काटा येथे इकोव्हॅन थांबवून तेथे चहा पिण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध पाजून चालकाच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरली. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात अडीच लाख रुपये किमतीची चालकाचे दागीने चोरीस केल्याचा गुन्हा अनोळखी चोरट्याविरोधात नोंदविण्यात आला आहे.