पनवेल : पनवेल शहरात गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः पनवेलमधून जाणारे विविध महामार्गांवरील खड्डे व खराब रस्ते यामुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शीव-पनवेल महामार्ग, मुंब्रा-पनवेल मार्ग, तसेच कळंबोली सर्कल ते कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीपर्यंतचा मार्ग खड्ड्यांनी भरलेला असून त्यामुळे या वाहनांना ब्रेक मारुनच प्रवास करावा लागत आहे.
मागील तीन दिवसांपासून पनवेलमध्ये पडत असलेल्या पावसामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहने संत गतीने जात आहेत. रस्त्यांवरील खड्डे पावसामुळे पाण्याने भरले गेले असल्याने चालकांना त्याचा अंदाज येत नाही आणि अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात घडत आहेत. अनेक दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसला असून काही ठिकाणी गंभीर अपघात झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत. “कळंबोली सर्कल येथे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते, पण प्रशासनातील अधिकारी मागील आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी का ही दुरुस्तीची कामे करत नाही,” असे मत कळंबोली चे शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी व्यक्त केले.
पावसाचे प्रमाण अजून काही दिवस असेच राहील्यास रस्ते दुरुस्तीची कामे अजून पुढे ढकलली जाऊ शकेल. या दरम्यान वाहतूक पोलीस विभागाने सार्वजनिक सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित सरकारी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. पनवेलमध्ये गेल्या २४ तासात ७३ मिलीमीटर पाऊस बरसला. पाऊस सतत पडत असला तरी पनवेलमधील कोणत्याही धरण व नदीने इशारा पातळी ओलांडली नाही.