पनवेल – कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात वाहनांचे सुटे भाग विकणा-यांनी एक किलोमीटरचा सेवा रस्त्याचा काही भागावर थेट वस्तूविक्री सुरू करून हा सेवा रस्ता आणि पदपथ गिळंकृत केला आहे. याबाबतची तक्रार कळंबोली पोलिसांकडे आल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी का होईना मात्र या विक्रेत्यांवर पोलिस आणि लोखंड पोलाद बाजार समितीने गुरुवारी कारवाई केली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याची चर्चा कळंबोलीत सुरू आहे.
कळंबोली येथील लोखंड बाजारातील शितल हॉटेल चौक ते फुडलॅण्ड चौकापर्यंतच्या सेवा रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. या सेवा रस्त्यावर गाळेधारकांनी वाहनांचे सुटे भाग विक्री सुरू केली. हे विक्रेते या कोंडीला काही प्रमाणात जबाबदार ठरत आहेत. १५ मीटर रुंदीच्या रस्त्यावर दोन ते तीन रांगेत अवजड वाहने एकमेकांना खेटून उभे करणे आणि त्यानंतर उरलेल्या पाच ते आठ फुटी रस्त्यावर विक्रीसाठी वाहनांचे सुटे भाग मांडल्यामुळे वाहनांना जाण्यासाठी एकच रांग शिल्लक राहत होती. वाहनांच्या सुट्या भागांच्या विक्रीमुळे येथील रस्ता व पदपथ गायब झाला होता. गाळ्यासमोरील पदपथ आणि रस्ता स्वमालकीचा असल्याप्रमाणे येथील व्यापारी वापरत होते. व्यापा-यांच्या याच अरेरावी विरोधात कळंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजीराव डुबल यांनी २०१० – ११ साली दंड थोपटले होते. पोलीस व सिडकोचे पथक घेऊन केलेल्या कारवाईत रस्त्याकडेला व्यापार करणा-यांनी केलेले दोन ते दहा फुट अनधिकृत बांधकाम त्यावेळी पाडण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. परंतू मागील अनेक वर्षे सरकारी अधिकारी हद्दीचा वाद घालून हा रस्ता कोणाच्या मालकीचा वाहतूक कोंडी हटविण्याची जबाबदारी कोणाची या वादामुळे रस्त्याकडेच्या या व्यापा-यांना मोकळे रान मिळाले होते.
तत्कालिन पोलीस अधिकारी डुबल यांच्याप्रमाणे कळंबोली पोलीस ठाण्याचे विद्यमान वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कोते यांच्याकडे बुधवारी तक्रार आल्यानंतर त्यानी मुंबई लोखंड व पोलाद बाजार समितीच्या सूरक्षा विभागाचे विलास धायगुडे यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली. हा रस्ता मुंबई लोखंड व पोलाद बाजार समितीच्या अखत्यारीत येत असल्याने समितीचे सूरक्षा अधिकारी धायगुडे यांनी बुधवारी सायंकाळी विक्रेत्यांना तूम्ही तूमचे सामान स्वताहून काढून न घेतल्यास गुरुवारी होणा-या कारवाईत संबंधित वस्तू जप्त करून घेणार असे ताकीद दिल्यावर बुधवार रात्रीपासून ते गुरुवारी दुपारपर्यंत २० विक्रेत्यांनी त्यांचे रस्त्यावर ठेवलेले वाहनांचे सुटे भाग उचलण्यास सुरूवात केली. गुरुवारी सायंकाळपर्यंत विक्रेत्यांची सामान उचलण्याची धावपळ सुरू होती. अशाचपद्धतीची ही मोहीम सतत पोलीस बंदोबस्तामध्ये राबवली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोते यांनी दिले आहे. सूमारे ६० हून अधिक विक्रेते हा सेवा रस्ता अडवून व्यवसाय करत आहेत. रस्त्यासोबत पदपथ मोकळे झाल्यास पायी चालणा-यांची सोय होईल.
या विक्रेत्यांनी संबंधित हलक्या व अवजड वाहनांचे सुटे भाग कुठून खरेदी केले याबाबत त्यांच्या जवळील कागदपत्र पडताळणी कऱणारी यंत्रणा लोखंड पोलाद बाजारात मागील २५ वर्षात फीरकली नाही. त्यामुळे लोखंड बाजारात दिडशे हून अधिक वाहनांचे सुटे भाग विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. वाहनांचे सुटे भाग खऱेदी करुन या बाजारातील रस्त्यावर जागा मिळेल तिकडे वाहन उभे करून वाहनांची दुरुस्ती करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. सरकारने हजाराहून अधिक गाळे येथे लोखंड विक्रीसाठी उभारले मात्र या गाळ्यांमध्ये सध्या लोखंड विक्रीपेक्षा इतर धंदे तेजीत सुरू आहेत. वाहनतळाचा अभाव असल्याने रस्त्यावर अवजड वाहन उभे केली जात आहेत. मात्र एका रस्त्याशेजारी एक वाहन उभे करण्याची मुभा मिळाल्याने एका शेजारी एक नव्हेतर तीन वाहने एकमेकांना खेटून उभी केली जात आहेत.
कळंबोली येथील लोखंड बाजारातील सेवा रस्त्यावर सर्वसामान्य वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याबाबत तक्रार आल्यानंतर स्थानिक पोलीस विभागाने लोखंड पोलाद बाजार समितीला याबाबत विक्रेत्यांकडून होत असलेल्या अतिक्रमनाबद्दल सांगीतले. हे अतिक्रमन काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. काही विक्रेत्यांनी स्वताहून त्यांचे सामान काढून घेतले. मात्र रस्ता व पदपथ अडवून सर्वसामान्यांची वाट अडविणा-यांवर कायदेशीर गुन्हे सुद्धा वेळ आल्यास दाखल करूराजेंद्र कोते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली पोलीस ठाणे</p>