पनवेल – लोकेनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्याप न दिल्याने बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक व नाम फलकावर काळा रंग उडवून लवकर दि. बा. पाटील यांचे नाव देण्याविषयी आक्रमक भूमिका घेतली.
महाविकास आघाडीतील विविध राजकीय घटक पक्षांनी पनवेलमध्ये महापालिकेविरोधात मोर्चा सुरू असताना मनसेच्या काही पदाधिका-यांनी घेतलेल्या या आक्रमक पाऊलामुळे यापूढे दि. बा. पाटील यांचे नाव द्या, अन्यथा याविषय़ीचे आंदोलन अजून तिव्र करण्याचा इशारा यानिमित्ताने मनसेने व महाविकास आघाडीने दिला आहे.
पनवेल महानगरपालिकेने स्वखर्चाने नवी मुंबई विमानतळाकडे जाणा-या महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणा-या मार्गाचे दिशादर्शक उभारले आहेत. या फलकांवर ” दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असेच लिहीलेले गेले पाहीजे अशी पनवेल व उऱण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. सध्या याविषय़ीचा अंतिम निर्णय केंद्र सरकार जाहीर करेल असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. राज्य सराकरने दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.
सप्टेंबर महिन्यात विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी केंद्र सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने केली जात आहे. मात्र सध्या केंद्र व राज्यामधील सत्तेमध्ये असणारे भाजप व इतर राजकीय पक्ष नामकरणाच्या आंदोलन रस्त्यावर उतरून करत नसल्याने महाविकास आघाडीने नामकरणाच्या मुद्यावर आक्रमक होत आहेत. मनसेने यामध्ये अग्रेसर भूमिका घेऊन पनवेल महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक फलकाला काळे फासून आंदोलनाची सुरूवात केली आहे.