पनवेल : मुंबईतील तारांगणाच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका खारघर येथे विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानावरील भव्य ‘अंतराळ संग्रहालय’ उभारणार आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या पुढाकाराने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास नुकतीच प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी महापालिका ४१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. लवकरच या अंतराळ संग्रहालयाच्या उभारणीबाबत निविदा प्रक्रिया सुरू होईल.

खारघर उपनगरामधील सिडको मंडळाने उभारलेल्या सेंट्रलपार्क या भव्य उद्याानामुळे बच्चेकंपनीला खारघरविषयी आकर्षण आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक शाळा पनवेल तालुक्यात आहेत. तसेच खारघरमध्ये शाळांची संख्या सर्वाधिक असल्याने महापालिकेने अंतराळ संग्रहालयासाठी खारघरमधील सेक्टर ३५ (एच) येथील प्लॉट क्र. १, क्षेत्रफळ २३,२६२.६१ चौ. मी. या भूखंडाची निवड केली. यासाठी महापालिका ४१.३४ कोटी रुपये खर्च करणार आहे. सिडकोकडून पनवेल महापालिकेला हस्तांतरित मोकळ्या भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाविषयी सखोल माहिती या संग्रहालयातून मिळू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेने या प्रकल्पासाठी एन.टी.टी. या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली असून, आराखडा, अंदाजपत्रक, बांधकाम आणि संपूर्ण प्रकल्पाचे ही संस्थाच पाहणार आहे. प्रस्तावित इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३४८५.१० चौ. मी. आहे. या इमारतीचा भाग सोलार यंत्रणेवर असणार आहे. तसेच हे संग्रहायल सीसीटिव्हीच्या कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असेल. पनवेल महापालिकेचा हा प्रकल्प भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवण्यासाठी एक प्रेरणादायी पायरी ठरेल, असा विश्वास पालिका आयुक्त चितळे यांनी व्यक्त केला आहे.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये

  • विज्ञान व अंतराळ विषयक प्रदर्शनी
  • १२० आसन क्षमतेचा विद्यार्थी बहुउद्देशीय हॉल
  • २२० आसन क्षमतेचा मुख्य बहुउद्देशीय हॉल