पनवेल – पनवेल महापालिकेच्या मालकीच्या अप्पासाहेब वेदक जलाशय म्हणजे देहरंग धरणातून पावसाळ्यात वाया जाणाऱ्या कोट्यावधी लीटर पाण्याचा वापर पनवेलमधील सिडकोने उभारलेल्या उपनगरांमध्ये करता येईल यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
पावसाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी देहरंग धरणाबाहेर पडणारे कोट्यावधी लीटर पाणी थेट नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली आणि कामोठे या वसाहतींना पुरवण्यात येणार आहे. सुमारे १४० कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी लागणार आहे. या नवीन जलयोजनेचा नवीन आराखडा बनविण्यात आला असून हा प्रस्ताव नगरोत्थान योजनेतून मंजुरीसाठी राज्याच्या नगर संचालनालयाकडे पाठविण्याच्या हालचाली पनवेल महापालिकेत सुरू आहेत.
पावसाळ्यातही खारघर, तळोजा या उपनगरांमधील शेकडो गृहनिर्माण संस्था टँकरचे पाणी खरेदी करत आहेत. पावसाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ पनवेलच्या काही परिसरात असल्याने पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या योजनेची आखणी केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.
दरवर्षी पावसानंतर जून अखेरपर्यंत देहरंग धरण तुडुंब भरून वाहू लागते. या धरणाची क्षमता ३.१२५ घन लक्ष मीटर आहे. १६ दश लक्ष लीटर पाणी या धरणातून दररोज पनवेल शहराला पुरवठा केला जातो. सध्या देहरंग धरणातून पनवेल शहरासाठी मिळणारे पाणी ५०० मीटर व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिनीतून पनवेल शहरातील एसटी आगाराशेजारी हौदावर आणले जाते. या जलवाहिनीला ठिकठिकाणी ठिगळ लावून त्यावर पनवेलकरांची तहान भागवली जात आहे. यामुळे दुप्पट क्षमतेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि ११०० मीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी नवीन प्रस्तावानुसार टाकल्यास हिवाळा व उन्हाळ्यात पनवेल शहराची तहान भागेल.
सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी सिडको वसाहतींना पुरवठा केले जाते. राज्याच्या नगर संचालनालयाने दिलेल्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर पुढील काही वर्षात पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्याचा वापर करता येईल.
देहरंग धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे सुमारे ७५ दश लक्ष लीटर पाण्याचा आपण वापर केल्यास पावसाळ्यात सिडको वसाहतींमधील पाण्याची टंचाई दूर करता येईल. भविष्यातील पनवेलची पाण्याची मागणी लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार केला आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल