पनवेल : पनवेल महानगरपालिकेने हरित पनवेलचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदाच्या वर्षात सव्वा लाख वृक्ष लागवड हाती घेतले आहे. परंतू दूसरीकडे सिडको मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा येथील घोटचाळ गावाशेजारी सुरु असलेल्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विस्तारामध्ये अडचण ठरणारी ७ ते १० वर्षे वयाची २२४ झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वृक्षतोडीबद्दल नागरिकांना माहिती मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या हरकती मागविण्याची जाहीर नोटीस बुधवारी (५ नोव्हेंबर) प्रसिद्ध केली आहे.

या झाडांमध्ये सुबाभूळ, जांभूळ, करंज, काजू, साग, निम, कदंब, सोनमोहर, आंबा, गुलमोहर, बहावा यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे. ही झाडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त भूखंडाभोवती परिधीय मार्ग आणि जलनिस्सारणासाठी (पावसाळी पाण्यासाठी नाला) बांधकामासाठी अडथळा ठरत आहेत.महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, नागरिकांनी या झाडांच्या तोडणीसंबंधी हरकती किंवा सूचना १२ नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात सादर कराव्यात. मुदतीत हरकती न आल्यास वृक्ष प्राधिकरण झाडतोडीस सशर्त परवानगी देण्याची कार्यवाही करणार असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी जुलै महिन्यात कळंबोली सर्कलच्या विस्तारासाठी १० ते ६० वर्षे वयाच्या ६९० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी नागरिकांच्या हरकती मागवल्या असूनही एकही हरकत महापालिकेकडे आली नव्हती. सध्या या पुनर्रोपणासाठी एमएसआरडीसीने प्रतिझाड १ हजार रुपयांप्रमाणे अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.वृक्ष प्राधिकरणाच्या नव्या नियमांनुसार, झाडतोडीपूर्वी तोड होणाऱ्या झाडांच्या वयाच्या प्रमाणात नवीन झाडे लावणे आणि त्यांचे सात वर्षे संगोपन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रतिझाड १० हजार रुपयांची अनामत रक्कम महापालिकेकडे जमा ठेवावी लागते.घनकचरा प्रकल्पाच्या विस्तारासाठी महापालिकेची ही झाडतोड प्रक्रिया पुढे जात असताना, ६९० झाडांच्या पुनर्रोपणानंतर आता पुन्हा २२४ झाडांची तोडणी प्रस्तावित झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.