पनवेल – तळोजा परिसरात सलग दोन हृदयद्रावक आत्महत्यांच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत हॉटेल मॅनेजमेंट शिकणा-या १९ वर्षीय तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तर दूस-या घटनेत नावडे गावात हुंडाबळी मुळे एका विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवले, या दोन्ही घटनांमुळे तळोजा व नावडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना २६ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास तळोजा उपनगरातील एका उंच इमारतीत घडली. हॉटेल मॅनेजमेंट शिकणा-या १९ वर्षीय तरुणीने इमारतीच्या आपत्तीवेळेसाठी राखीव असलेल्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याच इमारतीमध्ये ही विद्यार्थीनी आपल्या पालकांसह ११ व्या मजल्यावर राहत होती. पनवेल येथील महाविद्यालयात ती शिकत होती. मूळची सातारा जिल्ह्यातील राहणारी ही विद्यार्थीनी पालकांसोबत येथे राहत होती. दिवाळीची सुट्टी असल्याने ती घरी एकटीच होती. पालक घरी नसताना तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमेश गुठाळ हे अधिक तपास करीत आहेत. पालकांकडून या विद्यार्थीनीची माहिती विचारल्यावर ती गेल्या काही महिन्यांपासून मानसिक ताणात असल्याने तीचे उपचार सुरू असल्याचे पालकांनी सांगीतले. तळोजा पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दूसरी घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी तळोजातील नावडे गावात घडली. वैशाली विनायक पवार (वय २१) या विवाहितेने सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नावेळी हुंडा दिल्यानंतरही पती आणि सासरकडून आणखी एक लाख रुपये आणण्याचा दबाव तिच्यावर टाकला जात होता. छळाला कंटाळून वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी सहा जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून पिडीतेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पिडीतेचा पती उमेश पवार, सासरा रमेश पवार आणि सासू अरुणा पवार यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यावर १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे सांगितले.
