पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पनवेलमधील पदाधिकारी व माजी नगरसेवक गुरुवारी आक्रमक झाले. महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. या आंदोलनानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन चार टप्यात होणाऱ्या शास्ती माफीच्या अभय योजनेची माहिती दिली. यामध्ये पहिल्या महिन्यात थकीत कर भरणाऱ्यांना ९० टक्के अशी सर्वाधिक शास्ती माफी मिळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील दोन महिन्यांत चार वेगवेगळ्या टप्यात ही शास्ती माफीची अभय योजना लागू केली जाणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करून जोपर्यंत शास्ती माफीची योजना लागू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतल्यामुळे काही काळ पालिकेत तणावाचे वातावरण होते. काही वेळाने यामध्ये भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतल्यावर शास्ती माफीची योजना लागू करू अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
भाजपच्या आंदोलनाला आलेल्या तातडीच्या यशानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन चार टप्यात होणाऱ्या शास्ती माफीच्या अभय योजनेची माहिती दिली. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मागील आठ वर्षांपासून पनवेल महापालिकेच्या थकीत १२०० कोटी मालमत्ता कर वसुलीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. परंतु यामुळे ६०० कोटी रुपयांच्या शास्तीच्या रकमेवर महापालिकेला पाणी सोडावे लागणार आहे.
आयुक्तांनी करधारकांना दिलासा देताना एकवेळची विशेष बाब म्हणून ही अभय योजना आणत असल्याचे स्पष्ट केले. सर्वाधिक थकीत कराची रक्कम आणि शास्तीची रक्कम औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची आणि व्यावसायिकांची आहे. त्यामुळे या निर्णयाचा निवासी वापर करणाऱ्या करदात्यांसोबत कोट्यवधी रुपयांची शास्ती माफी वाणिज्य व उद्योजकांची होणार आहे.
शास्ती माफीचे चार टप्पे
मुदत — शास्ती माफी
- १८ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत कर भरणाऱ्यांना – ९० टक्के
- १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत कर भरणाऱ्यांना – ७५ टक्के
- १ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत कर भरणा-यांना – ५० टक्के
- ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या दरम्यान कर भरणा-यांना – २५ टक्के
पनवेल महापालिकेच्या ॲपमधून नागरिकांनी कर जमा केल्यास शास्ती माफीच्या योजनेसोबत २ टक्के सवलत सुद्धा मिळू शकेल. शास्ती माफीची ही अंतिम अभय योजना यापुढे राबविली जाणार नाही. यामुळे संबंधित योजनेचा सर्वाधिक करदात्यांना लाभ घ्यावा. एकरकमी सर्व थकीत कर भरल्यास या योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. तसेच चालू आर्थिक वर्षातील कर देयकाचा भरणा केल्यास चालु कर देयकावर पाच टक्के सूट नागरिकांना मिळू शकेल. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
भाजपने पनवेलच्या करदात्यांवर लादलेली शास्ती माफीसाठी अभय योजना आणावी यासाठी प्रधान सचिवांकडे पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी याविषय़ीचा निर्णय जाहीर करावा यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करावे लागले. पनवेलकर करदात्यांच्या संयम आणि संघर्षाला मिळालेला हा न्याय आहे. – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप