पनवेल – पनवेल शहरात रविवारी रात्रीपासून सुरू असणा-या सततच्या पावसामुळे कुंभारवाडा, कच्छी मोहल्ला, कापड गल्ली, मीरची गल्ली या सखल भागात पावसाचे पाणी साचून राहीले. यामुळे सोमवारी घराबाहेर कसे पडावे असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर उभा राहीला. पनवेल महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन तुंबलेले पाणी काढण्यासाठी आणि घरात अडकलेल्या नागरिकांना सूरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

पनवेल शहर हे खाडीकिनारपट्टीला खेटून असल्याने यापूर्वी अतिवृष्टीमध्ये कच्छी मोहल्ला व इतर परिसराला त्याची झळ पोहचत होती. मात्र अनेक वर्षानंतर कुंभारवाडा, मीरचीगल्ली येथे पाणी साचू लागल्याने पनवेलकरांची रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळी तारांबळ उडाली.

पनवेल शहराशेजारी सुरू असणा-या विविध बांधकामामुळे झालेल्या भरावामुळे तसेच गेल्या दोन दिवसात माथेरान डोंगररांगांमध्ये पडणा-या पावसामुळे पाणी शहरात साचत असल्याचे बोलले जात आहे. पनवेल शहरातील अनेक मोकळ्या जागांवर गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात राडारोडा व मुरूमचे भराव करून जमीनीवर मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. याचा परिणाम पसरात ज्या मोकळ्या जागा पावसाच्या पाण्याने व्यापत होत्या ते क्षेत्र रहिवास झाल्याने पाणी साचण्यासाठी शहरातील सखल भाग हाच एक पर्याय पावसाच्या पाण्याला राहीला आहे.

शहरातील पावसाळी पाणी ज्या गटारांमधून वाहून जाईल अशा गटारांच्या तोंडावर कचरा अडकत असल्याने आणि गटारांच्या अस्वच्छतेमुळे पावसाळी पाणी अनेक ठिकाणी थांबत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रविवारी ते सोमवारी सकाळी आठवाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पनवेल तालुक्यात झाली आहे. १६५ मीलीमीटर पाऊस पनवेल तालुक्यामध्ये बरसल्याचे रायगड जिल्हा माहिती जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.

माथेरान डोंगररांगामधून येणारे पाणी समुद्राला मिळण्यासाठी पनवेल येथून जात असल्याने माथेरान डोंगररांगांच्या परिसरात सोमवारी २७१ मीलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याशिवाय पनवेल शहर महापालिका क्षेत्रातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली व खारघर या परिसरात सरासरी सोमवारी सकाळी २० मीलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पनवेल शहरातील उर्दू शाळेत १९७ तर कोळीवाडा येथील शाळेत २११ जणांना सोमवारी सकाळपर्यंत स्थलांतरीत केले होते. या शाळांमधील स्थलांतरीतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. या स्थलांतर केंद्रामध्ये विविध सुविधा देण्याचे नियोजन महापालिकेने केले. सोमवारी सकाळी महापालिकेचे उपायुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख कैलास गावडे यांनी या शाळेला भेट देऊन तेथील नियोजनाचा आढावा घेतला. उर्दु शाळेसह कोळीवाड्याच्या शाळेत स्थलांतरीतांसाठी सकाळी नाश्ता, पाणी आणि वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर येथे उपलब्ध केल्याची माहिती उपायुक्त गावडे यांनी दिली.