पनवेल – पनवेलमध्ये झालेल्या शेकापच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत महाविकास आघाडीत सर्वाधिक उमेदवारांची संधी शेतकरी कामगार पक्षाला मिळावी, अशी ठाम मागणी केली. ताळमेळ नसलेल्या आघाडीच्या सध्याच्या स्थितीवर नाराजी व्यक्त करत, योग्य जागा न मिळाल्यास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. परंतू माजी आमदार बाळाराम पाटील यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढविली जाणार हे स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपली परंपरा जपणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) आपले निवडणूक चिन्ह गमावले असले, तरी महाविकास आघाडीत आपली प्रमुख भूमिका कायम राहावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी सोमवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात मांडली. पनवेल परिसरात आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा असून, याचा थेट फायदा सत्ताधारी भाजपला होऊ शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
हा मेळावा शहरातील आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी काशिनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, नारायण घरत, दत्तात्रय पाटील, राजेश केणी, अरविंद म्हात्रे,अनिल ढवळे,राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर मोरे, महादेव वाघमारे, गोपाळ भगत व तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पनवेल महापालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करताना मतदारयादीतील दूबार नावे तसेच रस्त्याच्या पुन्हा दुरुस्तीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.कार्यकर्त्यांनी प्रभागनिहाय उमेदवारांची घोषणा लवकर करण्याची मागणी केली, ज्यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच महाविकास आघाडीतील वाटाघाटीत शेकापच्या इच्छुकांना सर्वाधिक उमेदवारी निश्चित करण्यात यावी, अशी ठाम भूमिका नोंदवली.
महाविकास आघाडीची गरज शेकापसोबत आघाडीतील इतर घटक पक्षांना असल्याची आठवण या मेळाव्यात पदाधिका-यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली. “कार्यकर्त्यांची मागणी महत्वाची असली तरी आघाडीत समन्वय साधल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतूनच लढविणार आहोत,” असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आगामी निवडणुकीत पक्षाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
