पनवेल : गुरुवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने धरणातून दिवसाला १० ते १२ दशलक्षलिटर पाणीपुरवठा करणे सुरू केले. गेली दीड महिना दिवसाआड पाणीपुरवठ्यातून पनवेलकरांची सुटका झाली आहे.

पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा होता. मात्र मागील २० वर्षांपासून धरणातील गळ न काढल्याने तसेच मागणी वाढल्याने हा पाणीसाठा पनवेलकरांना अपुरा पडत आहे. त्यामुळे मार्च, एप्रिलपासूनच शहरात पाणी कपात केली जाते. त्यामुळे उन्हाळ्याचे पुढील काही महिने पनवेलकरांना पाण्याची मोठी काटकसर करावी लागत असते.

पनवेलचा हा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अमृत योजनेअंतर्गत पाताळगंगातून पाणी उपसा करून जलवाहिनीद्वारे पनवेलला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी गेल्या दीड महिन्यापासून पनवेल दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, तर गेली चार महिने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा लागत होता. त्यात पावसाने ओढ दिल्याने हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र गुरुवारपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पनवेल पालिकेने धरणातून दिवसाला १० ते १२ दशलक्षलिटर पाणीपुरवठा करणे सुरू केले.