नवी मुंबई : नवी मुंबई शहरात जवळजवळ २०० सार्वजनिक उद्याने आहेत. सर्वात जास्त उद्याने ही नेरुळ व बेलापूर विभागात आहे शहरातील उद्यानात पालिकेच्या दुर्लक्षामुळे बालगोपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानात लहान मुलांसाठी असलेल्या घसरगुंडीची दुरवस्था पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झोपाळे, नामफलक गायब आहेत. दरम्यान, वाशीतील उद्यानात एका मुलाचा पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही पालिका प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र आहे.

नेरुळ सेक्टर, १९,२१,२३, २५, परिसरात अनेक उद्याने असून सर्वात मोठे उद्यान असलेल्या शंकराचार्य उद्यानाकडे पालिकेचे व ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते. या उद्यानात मुलांना   खेळण्यासाठी लावलेली घसरगुंडी तसेच लहान मुंलाना बसण्यासाठीच्या बैठक व्यवस्थेचा पत्रा तुटला आहे. त्यामुळे लहान मुलांना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. उद्यानात असलेले झोपाळे तुटलेले तर काही झोपाळे गायब आहेत. उद्यानाचा नामफलकही काढून टाकण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

ही उद्याने म्हणजे मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे असून चालणे, व्यायाम करणे यासाठी शहरातील सर्वच उद्यानात नेहमीच गर्दी असते. वाशी सेक्टर ४ कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान, सेक्टर ७ येथील आई बाबा उद्यान सेक्टर ४ येथील निवारा शेड , वाशी सेक्टर १ ते ६ या विभागातील ट्री बेल्ट यासह वाशी मिनी सी शोअर परिसरातील उद्यानांमध्येही सुट्टीच्या व इतर दिवशी गर्दी पाहायला मिळते.

हेही वाचा >>> नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक

८० कोटी रुपयांची तरतूद

नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी जवळजवळ ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तरीदेखील शहरातील उद्यानांमधील खेळाची साधने कमी जास्त प्रमाणात तुटलेली वा खराब झालेली आहेत. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या बाबत सातत्याने तक्रारी समोर येत असतात.

नेरूळ येथील शंकराचार्य उद्यानात खेळणी तुटली असतील ती बदलण्यात येतील. शहरातील उद्यानामधील खेळण्यांनबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

२ नोव्हेंबरला वाशी सेक्टर १४ येथील उद्यानात पाण्याच्या टाकीत बुडून माझ्या मुलाचा मृत्यू झाला. पालिकेकडे पाठपुरावा केला. आयुक्तांनाही भेटलो. परंतु अद्याप विभागीय चौकशीच सुरू आहे. उद्यानांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. – विशाल उघडे, वाशीतील दुर्घटनाग्रस्त मुलाचे पालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिका अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. उद्यान विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष असून वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ उद्यानात ६ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतरही अद्याप पालिकेने कारवाई केली नाही. अधिकारी नागरिकांना जुमानत नाहीत. आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. उद्यानातील दुर्लक्षामुळे अजून किती मुलांच्या जीवाशी खेळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. – राजू शिंदे, माजी नगरसेवक ,वाशी