वाशी स्थानकापासून पायपीट
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून वाशीतील रिक्षाचालकांनी बुधवारी अचानक बंद पुकारला. सकाळी अचानक रिक्षा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनएमएमटी आणि बेस्टही अधिक गाडय़ा सोडू न शकल्याने सर्व बसगाडय़ांत गर्दी झाली.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास वाशी वाहतूक पोलीस शाखेने रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. अशी कारवाई दर काही दिवसांनी केली जाते, मात्र बुधवारी कारवाईदरम्यान वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांत बाचाबाची झाली. पोलिसांनी नियमबाह्य़ पद्धतीने रिक्षा चालवणार असला तर कारवाई करणारच असा पावित्रा घेतला त्यामुळे तणाव वाढला. रिक्षाचालकांनी रिक्षा बंद करण्याचा पावित्रा घेतला. त्यामुळे सकाळी वाशी स्थानकात आलेल्या शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
वाशी रेल्वे स्थानकाच्या एका बाजूला रिक्षा थांबा आहे, तर दुसरीकडे एनएमएमटीचे बस स्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोर्चा बस स्थानकाकडे वळवला. मात्र अचानक संप झाल्याने तिथेही प्रवाशांची प्रचंड मोठी रांग होती. पहिल्याच थांब्यावर बस पूर्ण भरल्यामुळे पुढे अनेक थांब्यांवर ती थांबवलीच गेली नाही. त्यामुळे त्या त्या थांब्यावरच्या प्रवाशांनाही मनस्ताप झाला. अखेर १२च्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड आणि रिक्षाचालकांत चर्चा झाली. लवकरच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असे ठरवण्यात आले आणि रिक्षाचालकांनी बंद मागे घेतला.
रिक्षाचालक सर्रास चौथा प्रवासी घेतात. त्यांच्यावर कारवाई करूच नये हा रिक्षाचालकांचा पावित्रा अचंबित करणारा आहे, असे नेहा शर्मा यांनी सांगितले.
आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे रिक्षाचालकांचे कर्तव्य आहे. मात्र सिग्नल तोडणे, प्रवासी संख्या जास्त असणे तसेच ठरवून दिलेल्या पेक्षा जास्त रिक्षा थांब्यावर उभ्या राहणे हे प्रकार वारंवार होत आहेत.
– सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
वाहतूक पोलिसांना कारवाई करतना रिक्षाचालकच सापडतात का? रिक्षांची संख्या वाढल्याने रिक्षा थांब्यावर संख्या वाढली आहे. त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय आमचे नेते आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
– सुनील ठाकूर, रिक्षाचालक