शिळफाटा-महापे उड्डाणपुलाच्या देखभालीवरून एमएमआरडीए-एमआयडीसीची टोलवाटोलवी
शिळफाटा ते महापे या मार्गावर असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीवरून सध्या एमएमआरडीए आणि एमआयडीसी या दोन प्राधिकरणांमध्ये वाद निर्माण झाला आहे. पुलाच्या देखभाल दुरुस्तीबाबत गांभीर्याने न घेता त्याची जबाबदारी घेण्यावरून टोलवाटोलवी सुरू असून त्यामध्ये या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्डय़ांत एखाद्याचा जीव गेल्यानंतरच हा प्रश्न निकालात निघणार का, असा संतप्त सवाल वाहनचालकांसह प्रवासी करीत आहेत.
मुंबई परिसरात असलेल्या सिप्झ, अंधेरी, ठाणे वागळे इस्टेट, नवी मुंबई आद्योगिक वसाहत आणि कल्याण, नाशिक, डोंबिवली तसेच गुजरात यांना जोडणारा शिळफाटा ते महापे हा महत्त्वपूर्ण रस्ता मानला जातो. या मार्गावरील महापे येथे दोन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या उड्डाणपुलावरून रोज हजारो ट्रक, कंटेनरसह अन्य लहान-मोठय़ा प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू असते. या उड्डाणपुलांमुळे औद्योगिक वसाहतींचे दळणवळण सुसह्य़ झाल्याने वेळ आणि इंधनाची मोठी बचत देखील होत आहे. मात्र हे प्राधिकरणांच्या वादात शिळफाटा-महापे उड्डाणपुलाची दुरवस्था दोन्ही उड्डाणपूल सध्या दुष्टचक्रात सापडले असून त्यांची अवस्था सध्या ‘कुणी ना उरला वाली आता’ अशी झाली आहे. या दोन्ही उड्डाणपुलांवर मोठमोठे आणि जीवघेणे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठय़ा आणि खोल खड्डय़ांमुळे गाडय़ांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांच्या माना आणि पाठ दुखावले जात लागत आहे.
हे खड्डे वाढत असून वाहनचालकांना सहज नजरेस पडत नाहीत ते चुकवताना त्यांना जीव मुठीत घ्यावा लागतो. खड्डय़ांजवळ गाडी आल्यावर अचानक एवढा मोठा खड्डा नजरेस पडल्यावर ब्रेक दाबले तर मागून येणारे एखादे वाहन आपल्या वाहनास धडकेल अशी सातत्याने भीती असते.
एमएमआरडीएने बांधलेले हे दोन्ही उड्डाणपूल सुमारे सहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई एमआयडीसीकडे हस्तांतरित केलेले आहेत. मात्र देखभाल दुरुस्ती कोणी करावी यावरून कलगीतुरा रंगलेला आहे.
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे फक्त ६०० जणांचा कर्मचारी वर्ग आहे. आम्ही बांधकाम करून संबंधित विभागाकडे हस्तांतरित करतो. त्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती त्याच विभागाचे कामगार करतात. तर दुसरीकडे मालकी आमची जरी असली तरी, देखभाल दुरुस्ती मात्र, एमएमआरडीएचीच आहे, असे एमआयडीसीकडून ठामपणे सांगितले जाते. या त्रांगडय़ात वाहनचालकांच्या जिवाशी मात्र खेळ होत आहे.
मी महापे येथील एका कंपनीत कामाला असून कल्याणहून दुचाकीवर येतो, मात्र दोन वेळेस गाडी खड्डय़ातून गेल्याने माणक्यांना मार लागला असून माझ्याच एका सहकाऱ्याला मानेच्या हाडाची समस्या सुरू झाली आहे. आता दोघांनाही हा त्रास कायमचाच जडला असल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे. -रणजित चव्हाण, वाहनचालक
दोन्ही उड्डाणपुलांचे हस्तांतरण झाले असले तरी देखभाल दुरुस्ती एमएमआरडीएकडे आहे. उड्डाणपुलावरील खड्डय़ाबाबत त्यांना कळवण्यात येईल व दुरुस्ती करून घेण्यात येईल. -एम. एस. कळकुटकी, कार्यकारी अभियंता एमआयडीसी
मी महापे येथील एका कंपनीत कामाला असून कल्याणहून दुचाकीवर येतो, मात्र दोन वेळेस गाडी खड्डय़ातून गेल्याने माणक्यांना मार लागला असून माझ्याच एका सहकाऱ्याला मानेच्या हाडाची समस्या सुरू झाली आहे. आता दोघांनाही हा त्रास कायमचाच जडला असल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे. -रणजित चव्हाण, वाहनचालक
आम्ही फक्त रस्ते वा पूल बांधून देतो. एकदा बांधकाम पूर्ण झाले की त्याचे हस्तांतरण संबंधित विभागाकडे करतो. महापे उड्डाणपुलाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एमआयडीसीचीच आहे. -संजय खराटे, जनसंपर्क अधिकारी एमएमआरडीए