PM Modi at Navi Mumbai Airport Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. लोकार्पणानंतर गुरुवारी सकाळी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ ते २०२२ या काळात सत्तेवर असलेल्या मविआ सरकारवर टीका केली.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, “आम्ही अशा वातावरणात वाढलो आहोत, जिथे राष्ट्रनिती हाच राजनितीचा आधार आहे. पायाभूत विकासासाठी लागणारा एक एक पैसा हा देशवासियांच्या सामर्थ्याला वाढवणारे माध्यम आहे. मात्र दुसरीकडे देशात असेही काही राजकीय लोक आहेत, जे जनतेची सुविधा नाही, तर सत्तेच्या सुविधेला महत्त्व देतात. हे लोक विकास कामात अडथळे निर्माण करतात. हे लोक भ्रष्टाचार, घोटाळे करून विकास कामांशी निगडित प्रकल्प स्थगित करतात.”
भारताने अनेक दशके प्रकल्प रखडल्यामुळे असे नुकसान सहन केले. आज ज्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, तो प्रकल्प अशाच लोकांची आठवण करून देतो. मी या मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनला आला होतो. तेव्हा मुंबईतील लाखो कुटुंबांना वाटले, त्यांच्या अडचणी संपतील. मात्र तसे झाले नाही, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.
“राज्यात काही काळासाठी वेगळे सरकार आले. त्यांनी मेट्रोचे काम थांबवले. त्यांना सत्ता मिळाली. पण देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना असुविधेचा सामना करावा लागला. आता मुंबई मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईत एका एका मिनिटाचे महत्त्व आहे. तिथे मुंबईकरांना या प्रकल्पासाठी चार ते पाच वर्षांची वाट पाहावी लागली, हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच्या काळावर टीका केली.
जानेवारी २०१७ मध्ये या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली होती. या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने मार्गिका याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक आणि इतर कारणांमुळे यास विलंब झाला. तसेच, कारशेडचा वाद, मार्गिकेसाठीच्या वृक्षतोडीचा वाद यामुळे हा प्रकल्प मुंबईतील सर्वाधिक वादग्रस्त प्रकल्प ठरला.
कारशेडच्या जागेच्या वादामुळे कारशेड आणि परिणामी मार्गिकेच्या कामास विलंब होऊन खर्च वाढल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जाताना दिसतो, ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला.