NMIA Inauguration 2025 : नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसरातील नागरिक आणि भाजप महायुतीचे २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासह राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत आणि पारंपरिक वाद्यवृंद सादर होणार आहेत. या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला केवळ विकासाचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महाउत्सव म्हणता येईल.

विमानतळाच्या टर्मिनलसमोर महाराष्ट्राच्या लोककलेचा अप्रतिम संगम अनुभवता यावा, यासाठी सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समूहाने महाराष्ट्राच्या लोककलेच्या गौरवगाथेच्या सादरीकरणाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात राज्यातील विविध प्रांतांतील लोककला, नृत्य, संगीत आणि पारंपरिक वाद्यवृंद सादर होणार आहेत. तब्बल ६० कलाकार आपल्या कलेद्वारे महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक प्रेक्षकांसमोर सादर करतील.कोल्हापुरातील लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्याविष्कार, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका आणि आदिवासी तसेच आगरी कोळी नृत्यांच्या तालावर संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे. विमानतळाचे लोकार्पण होण्यापूर्वी हे लोकसंगीताचे स्वर परिसरात गुंजणार असून, ‘विविधतेत एकता’ या राज्याच्या संस्कृतीच्या मुख्य विचाराची प्रत्यक्ष अनुभूती नागरिकांना मिळणार आहे.

हा कार्यक्रम केवळ उद्घाटन समारंभ नसून महाराष्ट्राच्या परंपरा आणि आधुनिकतेच्या संगमाचे प्रतीक ठरणार आहे. अनेक नृत्याविष्कार आणि लोककला सादर होतील. त्यानंतर लोककला, लोकसंगीत, भारूड, अभंग, पोवाडा अशा विविध प्रकारच्या लोककलांचा देवकी मीडिया प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरवाचा’ हा कार्यक्रम सादर होईल. उदय साटम या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत तर संगीत नियोजन साहिल रेळेकर यांनी केले आहे.

विमानतळ टर्मिनलसमोर महाराष्ट्राच्या लोककलेचा अप्रतिम संगम अनुभवता यावा यासाठी सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समूहाने महाराष्ट्राच्या लोककलेच्या गौरवगाथेच्या सादरीकरणाचे आयोजन केले आहे.

पॉइंटर्स -भव्य मंडपात तीन व्यासपीठे

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी दोन वाजून ४० मिनिटांनी उतरणार आहे.

– भव्य मंडपात सुमारे २५ हजार आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे.

– भव्य मंडपामध्ये तीन वेगवेगळे व्यासपीठ असणार आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री असतील. तसेच दुसरे व्यासपीठ राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असेल. हे मंत्री, आमदार, खासदार, सनदी अधिकारी यांच्यासाठी राखीव असेल. तसेच तिसरे व्यासपीठ मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी असेल.