पनवेल – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग वाहनांनी तुडूंब झाल्याने अजून अतिरीक्त वाहनांचा बोजा मुंबईवर पडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अवजड वाहनांचे प्रवेश बंदी केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी स्वता पुढाकार घेऊन मुंबईच्या दिशेकडे जाणा-या अवजड वाहनांना ( १० चाकी)  नवी मुंबईतच प्रवेश बंदीचे आदेश दाखवून थांबवले जात आहे.

नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्तांनी यासंदर्भात शुक्रवारी स्वतंत्र अधिसूचना जाहीर करून तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे ठाणे आणि पनवेलच्या अनेक ठिकाणाहून मुंबईत प्रवेश करणा-या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांना रोखण्यात येत आहे. 

पनवेल शीव महामार्गावर खारघर टोलनाक्याच्या पहिले पुरुषार्थ उड्डाणपुलाखाली कळंबोली पोलिसांनी बंदोबस्त लावून ही वाहने थांबविण्यात आली आहेत. तसेच रबाळे, एेरोली, वाशी, मुंबईच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना बंदीचे आदेश दाखवून थांबवून रस्त्याकडेला उभे केले जात आहे. 

माल घेऊन मुंबईत जाणा-या अवजड वाहनचालकांना आंदोलनामुळे एेनपावसाळ्यात जावे कुठे असा प्रश्न पडला आहे. आंदोलनामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभे केल्यास नवी मुंबईतील मुख्य महामार्गांवर सुद्धा वाहतूक कोंडी होऊ शकते अशी भिती असल्याने जोपर्यंत मुंबईची वाहतूक कोंडी फुटत नाही तोपर्यंत नवीन आदेश येईपर्यंत तातडीने वाहतूकादांशी वाहनचालकांशी संपर्क करून सूरक्षित ठिकाणी त्यांचे वाहन उभे कऱण्याची विनंती पोलिसांकडून अवजड वाहनचालकांना केली जात आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरूपती काकडे यांनी काढलेल्या आदेशात काय म्हटले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतूक करणा-या वाहनांना वाशी टोलनाका, अटलसेतू आणि एेरोली मार्गे मुंबईत प्रवेश कऱण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पुर्णता बंदी राहणार आहे.