नवी मुंबई: कळंबोली येथील तलावात आढळून आलेला मृतदेह रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पोलीस शिपाई सोमनाथ काशीनाथ फापाळे यांचाच असल्याचे समोर आले आहे. सोमनाथ हे ४ तारखेपासून बेपत्ता होते. दोन दिवसापूर्वी कळंबोली खाडीत येथील त्यांचा मृतदेह आढळून आला होता. मात्र त्याबाबत वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावरच पोलिसांनी हा मृतदेह पोलीस शिपाई सोमनाथ काशीनाथ फापाळे यांचाच असल्याचे स्पष्ट केले
तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सोमनाथ काशीनाथ फापाळे यांचा मृतदेह आढळून आला आहे. तळोजा परिसरातील कळंबोली खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेने संपूर्ण नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.फापाळे हे ४ सप्टेंबर रोजी रात्रपाळी करून घरी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत. बराच काळ शोधाशोध करून त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने फापाळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढत न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंभीरतेने शोधमोहीम सुरू केली होती. परंतु दोन दिवसापूर्वी तळोजा येथील खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मात्र तो अत्यंत वाईट अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी डीएनए तपासणी केली त्यात तो मृतदेह सोमनाथ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. आहे. त्यामुळे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शनिवारी त्यांच्या आहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांनी दिली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे फापाळे यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, नवी मुंबई पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समजले असले तरी तपास पुढे सुरु राहणार आहे. असेही धस यांनी स्पष्ट केले.
पार्श्वभूमी
बेपत्ता झालेले सोमनाथ काशीनाथ फापाळे (३१) हे कळंबोली रोड पाली येथे राहतात. चार सप्टेंबरला त्यांना रात्रपाळी ड्युटी होती. तसें ते पोलीस ठाण्यात हजर ही झाले होते. त्या रात्री त्यांनी रात्रपाळी केली. मध्यरात्री त्यांचा आणि पत्नीचा संवाद मोबाईल वर झाला त्यावेळी त्यांनी गस्ती पथकात असून वाशी येथे असल्याचे सांगितले होते. तर सकाळी पावणे साडे सहा वाजता पत्नीने त्यांना फोन केला असता थोड्या वेळाने करतो असे सोमनाथ यांनी पत्नीला सांगितले. शेवटचा फोन पावणे आठला झाला त्यावेळी त्यांचा आवाज वेगळा वाटल्याने पत्नीचे विचारणा केली असता मी टेन्शन मध्ये आहे फोन चार्जिंगला लावतो नंतर करतो म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्या नंतर मात्र सोमनाथ यांच्याशी संपर्क झालाच नाही. याबाबत सोमनाथ यांच्या सहकारी राजेश हनवते यांना सोमनाथ यांच्या पत्नीने विचारले असता सोमनाथ सकाळी साडे सात वाजता काम संपवून कामावरून निघून गेले असे सांगण्यात आले. शेवटी एक दिवस वाट पाहून ५ तारखेला सोमनाथ यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात सोमनाथ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली .