पनवेल महापालिका निवडणूकीला अजून काही महिन्यांचा अवकाश असताना कळंबोली उपनगरातील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी दिवाळी सणानिमित्त आयोजित दिवाळी पहाट या सुरेल कार्यक्रमांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केल्यामुळे प्रेक्षकांना कोणत्या सूरेल मैफीलीसाठी जाऊ असा प्रश्न पडला होता.
सूरेल कार्यक्रमांच्या आडून मतदारांना आपल्याच कार्यक्रमाच्या मंडपापर्यंत आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या पदाधिका-यांची यानिमित्ताने स्पर्धा पाहायला मिळाली. या स्पर्धेत सर्वाधिक महिलावर्गाची उपस्थिती भाजप आयोजित कार्यक्रमासाठी लागल्याचे दिसले.
दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा दिवाळी सणापूर्वी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत उटण्याची पाकीट वाटण्यासाठी राजकीय महत्वाकांक्षा असणा-या व्यक्तींनी पनवेलमधील अनेक प्रभागात मतदारांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाने पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे आणि खारघर या उपनगरांमध्ये दिवाळी संध्या आणि दिवाळी पहाट असे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाजपचे माजी नगरसेवक बबन मुकादम तसेच भाजपच्या उत्तर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रिया मुकादम यांनी कळंबोली येथील सेक्टर ६ मधील साईनगर सोसायटीजवळच्या सिडको उद्यानात दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजपाने या कार्यक्रमाच्या आयोजनाचे फलक जागोजागी उपनगरात लावल्यानंतर तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व तुषारदादा पाटील युवामंच यांनी पुढाकार घेऊन सेक्टर ५ येथील हिंदुस्थान बॅंकेशेजारील मोकळ्या जागेवर दिवाळी पहाटचा कार्यक्रमाचे आयोजन केले.
एकाच रस्त्यावरील काही अंतरावर असणा-या या दोनपैकी कोणत्या कार्यक्रमातील सूर एेकायचे असा पर्याय निवडण्याची संधी कळंबोलीतील नागरिकांना पहिल्यांदा मिळाली. भाजपच्या कार्यक्रमात एकसारख्या दिसणा-या साड्या नेसून आलेल्या महिलावर्गाने सर्वांचे लक्ष्य वेधले होते. तसेच दोन्ही पहाटेच्या कार्यक्रमांमध्ये सूरेल गीत एेकण्यासाठी अभ्यंगस्नान करून आलेल्या महिलांसोबत पुरुष वर्गाची संख्या मोठी होती. कळंबोली येथील प्रभाग ८ हा उपनगरातील सर्वात महत्वाचा प्रभाग आहे.
उपनगरातील मध्यवर्ती हा प्रभाग असल्याने घाटमाथ्यासह, कोकण आणि इतर राज्यातून राहणा-या कॉस्मोपॉलीटीन मतदर या प्रभागात आहे. महापालिकेच्या मागील निवडणूकीत शेकाप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतील उमेदवारांना या प्रभागातील मतदारांनी भरघोष मतदान करून निवडून दिले.
यापैकी शेकापच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या बबन मुकादम यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातामध्ये घेतले. त्यामुळे प्रभाग ८ मध्ये शेकाप, राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील मंडळींना स्वताचा बालेकिल्ला ताब्यात रहावा यासाठी खटाटोप सुरू असताना मुकादम यांनी सुद्धा प्रभागातील स्वतासह कमळाचे अस्तित्व दाखवण्यासाठी अशा कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे भाजपच्या प्रभाग ८ मधील कार्यक्रमाला आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिकेतील सा-याच मुख्य पदाधिका-यांनी हजेरी लावली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सतीश पाटील, युवा पदाधिकारी तुषार पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील, गोपाळ भगत यांनी हजेरी लावली.