पनवेल : गोरगरीब जनता रस्त्याकडेच्या झोपडीत राहून मिळणा-या रोजगारावर पोटाची खळगी भरतात, मात्र अशा गोरगरीबांच्या घरातील बालकांना पुरेशे अन्न मिळावे यासाठी खारघरमध्ये अनेक सामाजिक सेवाभावी संस्था जेवण वाटपाचे काम करतात. अशा गरीब जनतेसोबत भुक्या भटक्या श्वानांचा सुद्धा जेवणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांनाही श्वानप्रेमी खारघरवासीय रात्रीचे घराबाहेर पडून खाद्यपदार्थ देतात मात्र सध्या खारघरमध्ये भटक्या श्वानांसोबत सुवर्णकोल्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक सेवा पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. 

खारघर उपनगरामध्ये सर्वाधिक पर्यावरण आणि प्राण्यांवर प्रेम करणारे नागरिक राहतात. उपनगरातील अनेक घरांमध्ये माणसांसोबत पाळीव श्वान पाळणारा मोठा वर्ग आहे. पाळीव श्वानां सोबत भटक्या श्वानांचाही विचार करणारे नागरिक येथे रात्रीच्या काळोखात दुचाकीवरून जाऊन श्वानांना खाद्यपदार्थ वाटप करत असल्याचे चित्र उपनगरात दिसते. भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ टाकताना खारघर उपनगरातील भगवती ग्रीन्स २ या इमारतीलगत सेंट्रलपार्क या भव्य उद्यानाचे कुंपण आहे.

या ठिकाणी सेंट्रल पार्कमध्ये वाढलेल्या झुडपांमध्ये रात्रीच्या वेळेस हे सुवर्णकोल्हे भुकेमुळे खाद्याच्या शोधात इमारतीलगतच्या रस्त्यावर मध्यरात्रीनंतर बाहेर येतात. सेंट्रलपार्क येथील श्वानांच्या उद्यानाशेजारी या परिसरात भटक्या श्वानांसाठी ‘हंगर हिरोज फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक सिंग व त्यांची पत्नी पल्लवी हे खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी येतात, मात्र गेल्या दोन दिवसांपासून श्वानांसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थावर सुवर्ण कोल्यांना खायला मिळत असल्याचे ते सांगतात. हे कोल्हे खाद्यपदार्थासाठी सेंट्रलपार्कच्या बाहेर येत असल्याची चित्रफीत सुद्धा दीपक सिंग यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. अशा प्रकारची दोन जोडपी खारघरच्या सेंट्रलपार्क परिसरात अनेकदा रस्त्यावरून येजा करताना खारघरवासीयांना दिसली आहेत. 

खारघरच्या मुळात अनेक भागात आमची संस्था गरीबांना जेवण आणि भटक्या श्वानांना खाद्यवाटपाचे काम सातत्याने करते. खारघर हे मुळात जंगल होते. जंगलामध्ये खारघर ही लोकवस्ती वसविल्याने तेथील प्राण्यांना त्यांच्या जंगलावर मनुष्याने आक्रमण केल्याची भावना वाटत असावी. त्यामुळे ते कुठे जातील असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सेंट्रलपार्क येथील नाल्यांमध्ये मिळणारे मासे खायला मिळाल्यास त्यांची भूक काहीवेळा भागत नसावी मात्र मी भगवती ग्रीन्स २ या सोसायटीत राहत असल्याने आम्हाला रात्रीच्यावेळी अनेकदा कोल्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला मिळतो. सध्या भटक्या श्वानांसाठी ठेवलेले मांसाहार कोल्ह्यांना मिळत आहे. दीपक सिंग, संस्थापक, हंगर्स हिरोज फाऊंडेशन