पनवेल – पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर पनवेल येथील आदई गावाशेजारी रविवारी सायंकाळी प्रवासी बस आणि इरटीगा मोटारीत झालेल्या अपघातामध्ये सात प्रवासी जखमी झाले. बसथांबा नसताना सुद्धा प्रवासी वाहतूक करणारी बस येथे थांबविण्यात आल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पूणे मुंबई द्रुतगती महामार्ग कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेल येथून सुरू होतो. द्रुतगती महामार्गावर बसथांब्याची सोय नसल्याने द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर खांदेश्वर आणि नवीन पनवेल येथील प्रवाशांनी त्यांच्या सोयीसाठी आदई गावाजवळील पुल संपल्यावर लगेच बस थांबवून तेथे उतरतात. त्यामुळे आदई गावाजवळ द्रुतगती महामार्गावर बेकायदा बसथांबा बनला आहे.
रविवारी सायंकाळी पूणे येथील मुंबईकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४७. बीएल. २७३६ या बसच्या चालकाने प्रवाशांना उतरविण्यासाठी भरधाव वेगात असलेली बस आदई गावाजवळील पुल ओलांडल्यानंतर लगेच महामार्गालगत उभी केली. पाऊस सुरू असल्याने या बस अचानक थांबल्याने या बसच्या पाठीमागून येणा-या इरटीगा मोटार चालकाने मोटारीचा ब्रेक मारला. मात्र पावसामुळे ब्रेक लागला नाही आणि मोटारीची मागून बसला धडक बसली. या अपघातामध्ये सातजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांसह ११ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. नजीकच्या रुग्णालयात जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांना घऱी सोडून देण्यात आले.
याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात नेरुळ येथे राहणारे चालक संतोष आरोटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ३० वर्षीय बसचालक राहुल गोडीया याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा आदई गावाजवळील या बेकायदा बसथांब्यावर अनेक अपघात घडले आहेत. एमएसआरडीसी प्रशासनाने हा बेकायदा बसथांबा बंद करण्यासाठी तातडीने प्रतिबंधक उभारावेत तसेच नवीन पनवेल व खांदेश्वर आणि ग्रामीण पनवेलला द्रुतगती महामार्गाशी थेट जोडणारी कायदेशीर नवीन मार्गाका बांधावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.