|| पूनम धनावडे

झेंडूसह शेवंती, अष्टर, गुलछडी फुलांची विक्री मंदावली :- श्रावण महिना ते दिवाळी सणापर्यंत झेंडूच्या फुलांना बाजारात अधिक मागणी असते. परंतु यंदा सण पावसातच साजरे करावे लागले. लक्ष्मीपूजनकरिता लागणाऱ्या हार, फुलांकरिता बाजारपेठेत झेंडू, शेवंती, अष्टर, गुलछडी ही फुले विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु सततच्या पावसाने फुलांच्या उत्पादनावर पाणी फेरले आहे. फुलांची विक्री मंदावली आहे.

पुणे, कोल्हापूर, सांगली या पट्टय़ात झेंडूच्या फुलांची लागवड केली जाते. फुलांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांत अधिक मागणी असते.  उत्पादन तर चांगले आले आहे, परंतु फुले भिजल्याने लवकर खराब होत आहेत. भिजलेली फुले लवकर काळी पडत आहेत. दसऱ्यापासून झेंडूच्या फुलांचे दर स्थिर आहेत. बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवर फुले विक्री होत आहेत.

 

पावसामुळे भिजलेली झेंडूची फुले येत आहेत. त्यामुळे फुले लवकर खराब होत आहेत. फुलांमध्ये पाणी मुरल्याने काळी पडत आहेत. पावसामुळे ग्राहकांचा ओघदेखील ओसरला आहे. -रंजना शिंगोटे, फुलविक्रेते मॅफको मार्केट, वाशी

झेंडूच्या फुलांचे उत्पादन येऊनही सततच्या पावसाने पिकांवर मात्र पाणी फेरले आहे. फुलांमध्ये पाणी गेल्याने त्यांचा टिकाऊपणा कमी झाला असून लगेच काळी पडणे, खराब होत आहेत.-जगन्नाथ चाकुरे, झेंडू फूल बागायतदार, पुणे</strong>