उरण : सिडकोने उरण – पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या दुरुतीचे काम पूर्ण झाल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकरात लवकर हा पूल खुला करून मार्गावरून प्रवासी एसटी बस सुरू करण्याची मागणी आता येथील नागरिकांनी केली आहे. मागील चार वर्षांपासून येथील बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आणि पाणजे या चार गावांतील नागरिक आणि प्रवाशांना याची प्रतीक्षा आहे. उरण पनवेल मुख्य मार्गावरील हा खाडीपूल कमकुवत असल्याने या मार्गावरील एसटी व एनएमएमटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार

खाडीपूल त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेने तसेच बोकडवीरा ग्रामस्थांनीही आंदोलन केले होते. सिडको कार्यालयावर आंदोलन केले होते. हा पूल कमकुवत असल्याचा अहवाल आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे मार्गावरील जड व प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस हाईटगेट लावून बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या हाईट गेटमुळे आतापर्यंत २५ पेक्षा अधिक वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.

हेही वाचा >>> नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा

त्यावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता श्रीकांत गोसावी यांनी जानेवारी २०२४ पर्यंत पुलाची दुरुस्ती करून प्रवासी वाहनांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र काम पूर्ण होण्यास विलंब झाला असून त्यासाठी एप्रिल महिना उजाडला आहे. हा पूल बंद असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी यांना अधिक वेळ आणि खर्चाचा प्रवास करावा लागत आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे प्रमाणपत्र आयआयटीकडून आले असून रस्ता जड वाहनांसाठी खुला करण्यासाठी वाहतूक विभागाला पत्र देण्यात येणार असून त्यानंतर या मार्गावरील हाईट गेट हटविण्यात येणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.