महाविकास आघाडीतील इच्छुकही पर्यायाच्या शोधात

नवी मुंबई</strong> : पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी एक वर्षांपूर्वी भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या नगरसेवकांना पक्षात लाल गालिचा अंथरण्याचे काम सध्या नवी मुंबई शिवसेनेत सुरू असून यामुळे पक्षात नाराजी वाढत आहे. नवीन गवते यांना त्यांच्या दोन नातेवाईक नगरसेवकासंह नुकताच पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र याबाबत माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. त्यामुळे चौगुले नाराज असल्याचे समजते. तसेच नवीन उमेदवारांच्या प्रवेशामुळे गेली अनेक वर्षे पालिका निवडणुकीची तयारी करणारे शिवसैनिक कमालीचे नाराज झाले असून आम्ही केवळ पालखीचे भोई व्हायचं का अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

सहा वर्षांपूर्वी झालेल्या नवी मुबंई पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी हिरावून घेतला होता.  शिवसेना महापौर पद पटकाविण्याच्या तयारीत होती. मात्र त्या वेळी नाईक यांनी अपक्ष नगरसेवकांना तात्काळ कोकण विभागीय आयुक्तांकडे सहकाऱ्यांचे पत्र देऊन पाच अपक्ष नगरसेवकांच्या जोरावर पालिकेतील सत्ता कायम ठेवली. त्या वेळी नाईक यांनी अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना महापौर पद देण्याची राजकीय खेळीदेखील पूर्ण केली. या पालिका निवडणुकीत ३२ शिवसैनिकांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला पालिकेचा सत्तासोपान गाठता आला नाही. या वर्षी पािलकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली असून भाजपमधील आयारामांना लाल गलिचे अंथरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी निवडणुका होतील असे गृहीत धरुन २०१९ च्या डिसेंबरमध्ये तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांना पक्षप्रवेश देण्यात आला. कुलकर्णी व गवते यांच्याकडे असलेले प्रभाग कायम ठेवण्याच्या अटीवर हा प्रवेश असून या नगरसेवकांना त्यांच्या नातेवाईकांसाठी आणखी प्रभाग हवे आहेत. त्यामुळे गेली तीस वर्षे पालिका निवडणूक लढविण्याची स्वप्न पाहणारे शिवसैनिकांचे अवसान गळले आहे. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याची तयारी झाली असून प्रभाग वाटपदेखील झालेले आहेत. नाईक यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी महाविकास आघाडी हा चांगला पर्याय असल्याचे मत या पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपचे दरवाजे ठोठवण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे येथील पाटील कुटुंबीयदेखील भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जाण्याच्या पूर्ण तयारीत आहे. त्यांना त्या बदल्यात चार प्रभागांची खात्री हवी आहे. या चार प्रभाग मागणीत शिवसेनेचा कोपरी गावातील एक माजी नगरसेवक विलास भोईर दुसरा पर्याय शोधणार आहे.

मान-अपमान

नवी मुंबई शिवसेनेतील उपनेते विजय नाहटा व जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यात विस्तव जात नाही. तीन जानेवारीला शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर वास्तुशांती आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून सध्या वादविवाद सुरूआहे.