लोकसत्ता वार्ताहर
नवी मुंबई : एपीएमसीतून यापूर्वी शहरात वाढलेला करोना संसर्गाचा पूर्वानुभव पाहता महापालिका प्रशासनाने येथील पाचही बाजारांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाजारात चाचणी केंद्र उपलब्ध करून दिले असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे.
दिवाळीपूर्वी नवी मुंबईत कमी झालेली करोना रुग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढली आहे. बुधवारी १३१ तर गुरुवारी १७५, शुक्रवारी १६८, श्निवारी १६९ व रविवारी ११६ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ही संख्या येत्या २८ दिवसांत वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात बंद झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका आता पुन्हा सुरू करण्यात आल्या असून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ संवाद साधण्यात आला आहे. करोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. यासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. करोना संसर्ग पसरू लागल्याने नवी मुंबईत एप्रिल-मे महिन्यात रुग्णवाढ झाली. यात एपीएमसी बाजारातील गर्दी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने एपीएमसीवर लक्ष केंद्रित केले आहे.
आजही एपीएमसी बाजारात काही ठिकाणी सामाजिक अंतर, मुखपट्टी वापरण्यात येत नाही. यासाठी कारवाई करण्यासाठी पालिकेने विशेष भरारी पथके नेमली आहेत. तरीही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे येथील धोका लक्षात घेता येथील पाचही बाजार समितीत करोना चाचणी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. या ठिकाणी २४ तास कारवाई करण्यासाठी भरारी पथकांत वाढ करण्यात येणार आहे. बाजार घटकांवर शिस्त लागावी यासाठी एपीएमसी प्रशासनालाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक वसुलीबरोबरच कायदेशीर कारवाई करून एक दिवसाकरिता त्यांचे गाळे सील करण्याचे आदेशही एपीएमसी सचिव यांना दिले आहेत.
नवी मुंबई शहरात करोनाची दुसरी लाट येऊ नये याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एपीएमसीमध्ये करोना चाचणी केंद्रे वाढवण्यात आली आहेत. भरारी पथके नेमून २४ तास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका