रस्ता रुंदीकरणात अवघ्या एक किलोमीटर अंतराचे मार्ग काम अपूर्ण राहिल्याने खारघरवासीयांची कोंडी सहन करावी लागत आहे.
शीव-पनवेल महामार्गावरून खारघरमध्ये येण्यासाठी कोपरा येथील पुलाचा वापर वाहनचालक करतात; मात्र वाहनांच्या संख्येमुळे येथे वाहतूक कोंडी होत असते. दहा वर्षांपासून येथे मार्गाची मागणी करण्यात येत आहे. खारघर ‘कार सिटी’ म्हणून नवी मुंबईत प्रसिद्ध आहे. येथे सर्वाधिक हलक्या वाहनांची येजा असते. स्पॅगेटी परिसरात जाण्यासाठी कोपरा मार्गावरील पुलावर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. यातून मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र २५ मीटर रुंदीचा मार्ग बनविण्याचे काम सिडकोने हाती घेतले होते. परंतु हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. या मार्गावरील सुमारे एक किलोमीटर अंतराचे काम ठप्प झाले आहे. या मार्गात नवी मुंबई महानगरपालिकेची जलवाहिनी आणि मलनिस्सारण वाहिनी आहे. तिचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करता येणार नाही, अशी माहिती सिडको प्रशासन अधिकाऱ्याने दिली. भूमिगत मार्ग बनविण्याविषयीचा प्रस्ताव मागील दोन महिन्यांपूर्वी पाठविल्याचे सांगण्यात येत आहे.
जलवाहिनीचे स्थलांतर करताना संबंधित नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पाणी पुरवठा सुरळीत ठेवून काम कसे पूर्ण करता येईल, याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल.
– प्रदीप डहाके, अधीक्षक अभियंता, सिडको