नवी मुंबई : नवी मुंबईलगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. मात्र आजही पाण्याचा निचरा होण्याची समस्या आणि डाव्या मार्गिकेवरील खड्डे कायम आहेत. त्यामुळे एवढ्या विकासकामांनंतरही पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यातून प्रवास आणि अचानक येणारे खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा त्रास कायम असल्याचे चित्र आहे.
एमआयडीसीमध्ये एकूण १३६ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २१ किलोमीटरच्या रस्त्यांचे काम एमआयडीसी करत आहे. हे २१ किलोमीटर रस्ते रबाळे आणि महापे एमआयडीसी पट्ट्यातील आहेत. उर्वरित ११५ किलोमीटरचे रस्ते मनपाकडे असून यातील बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेले आहे. मात्र हे काँक्रीटीकरण करताना दोन रस्ते जेथे जोडले जातात वा डावीकडील मार्गिका या दरम्यानच्या भागाचे काम निकृष्ट झाल्याने पहिल्या पावसातच खड्डेमय झाला आहे. त्यात जी सिमेंट काँक्रीटीकरण कामे झालेली आहेत. अशा ठिकाणी पावसाचे पाणी जाणारे अनेक ठिकाणी छिद्र रस्त्यांच्या उंचीपेक्षा वर झाल्याने थोड्या पावसातही रस्ते जलमय होतात.
रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झाले असले तरी डावीकडील मार्गिकेवर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. जे पावसाळ्यात हमखास निखळून रस्ता खड्डेमय होण्यास सुरुवात होते. काँक्रीटीकरण रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंट उखडून खड्डे झालेले आहेत. पाणी साठण्याची सर्वात बिकट परिस्थिती तुर्भे एमआयडीसीत असून मॅनहोल धोकादायक झाले आहेत. रस्त्यांचे सपाटीकरण (लेव्हलिंग) व्यवस्थित नाही, गटार कठडे उंच, अशी स्थिती आहे. याप्रकरणी आम्ही अनेक आंदोलने केली, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे उपशहर प्रमुख महेश कोठीवाल यांनी दिली. याप्रकरणी मनपा अभियांत्रिकी विभागाशी माहितीसाठी प्रयत्न केले, मात्र संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही.
- तुर्भे एमआयडीसी बोनसारी, चुनाभट्टी, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी, तुर्भे महापे टी जंक्शन या ठिकाणी पाणी साचते. बोनसारी, चुनाभट्टी या ठिकाणी पाण्याचा निचरा होणाऱ्या गटारीच्या कठड्यांची उंची रस्त्यापेक्षा अधिक झाल्याचा दावा बोनसारी येथे राहणारे विकास कांबळे यांनी केला आहे.
- एमआयडीसी प्रशासन रबाळे आणि महापेच्या काही भागातील रस्ते बांधकाम करीत असून अनेक वर्षांपासून रबाळे नाल्यावरील रस्त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. अशी माहिती एका कारखान्यात व्यवस्थापक असणारे प्रभाकर जगताप यांनी दिली.
रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर पॅच अप वर्क करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्याने कामाची गती कमी आहे, लवकरच पूर्ण काम झाल्यावर रस्ते सुसज्ज होतील.- आर. जी. राठोड (कार्यकारी अभियंता एमआयडीसी)