नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयात संबंधित जमिनीच्या हक्काबाबत खटला प्रलंबित असताना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने थेट बिवलकर कुटुंबियांच्या वारसांना जमीन कशी दिली, असा थेट सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा स्फोटक आरोप केला. शिंदे गटाचे विद्यमान मंत्री संजय शिरसाठ यांची सिडको मंडळाच्या अध्यक्ष पदावर केलेली नेमणूक ही जमीन घोटाळ्यासाठीच होती, असा थेट घणाघात करत आ. पवार यांनी साडेबारा टक्के योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड केला.
नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांसाठी राखीव असलेली, तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या बाजारभावाची १५ एकर जमीन, शिरसाठ यांनी सिडको अध्यक्षपदावर असताना, इंग्रजांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबियांच्या वारसांच्या घशात घातल्याचा आरोपही त्यांनी केला. ही जमीन प्रत्यक्षात सिडकोच्या सामाजिक दायित्वाची होती; मात्र राजकीय हितसंबंधांसाठी ती मुठभर लोकांच्या हाती दिली गेल्याचे चित्र त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.या गंभीर प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह बुधवारी (ता. २० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नवी मुंबईतील बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा पवारांनी केली.
स्थानिक नागरिकांनी अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेचा उद्देशच वंचितांना न्याय देणे हा असताना, त्या जागेवरच डोळा ठेवून सत्तेच्या राजकारणातून घडवलेला हा घोटाळा असल्याचा ठपका पवारांनी ठेवला. त्यामुळे बुधवारीचा मोर्चा हा फक्त जमीन वाचविण्याचा नाही, तर न्याय आणि हक्कासाठीच्या मोठ्या संघर्षाची सुरुवात असेल, असा संदेश त्यांनी दिला.
