नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये इमारतीचा पाया खणण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियंत्रित स्फोटांमुळे आसपासच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर हादरे बसत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येऊनही महापालिका प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस नियमावली आखलेली नाही.

सीवूड्स विभागात सेक्टर ४६ येथील एका वसाहतीमधील इमारतीचे प्लास्टर लगतच सुरू असलेल्या एका नव्या बांधकाम प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या स्फोटामुळे मंगळवारी कोसळले. त्यानंतर या प्रकल्पातील एका बड्या बिल्डरला स्फोट थांबविण्याचे तोंडी आदेश महापालिकेने दिल्याने येथे शुकशुकाट आहे.

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याच्या भीतीने महापालिकेने उशिरा का होईना यासंबंधीचे पाऊल उचलले असले तरी हे स्फोट नेमके किती दिवस बंद राहतील, शिवाय शहराच्या इतर भागातील बांधकामांचे काय, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

सीवूड्स विभागातील सेक्टर ४६ परिसरात गामी बिल्डरमार्फत एका मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम करताना इमारतीचा पाया खणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नियंत्रित स्वरूपाचे स्फोट केले जात होते. या स्फोटांच्या हादऱ्यांमुळे या भागातील रहिवासी अक्षरश: मेटाकुटीस आले होते. इमारतींना बसत असलेल्या हादऱ्यांमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे जाणे, प्लास्टर निखळणे असे प्रकारही नित्याचे होऊन बसले होते. वारंवार तक्रारी करूनही शासकीय यंत्रणा दाद देण्यास तयार नव्हत्या. अखेर मंगळवारी महापालिका प्रशासनाला अचानक जाग आली.

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

महापालिका नगररचना विभागाने गामी बिल्डरला हे स्फोट थांबविण्याचे आदेश दिले. असे असले तरी नियमांची पायमल्ली करत सुरू असलेल्या या स्फोटांप्रकरणी महापालिकेने चौकशी सुरू केलेली नाही. अथवा काम थांबविण्याचे कोणतेही लेखी आदेश दिलेले नाहीत अशी विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या तोंडी आदेशांना बिल्डर किती दिवस भीक घालेल अशी चर्चा सुरू आहे.

वाशीतील काही रहिवाशांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता ‘महापालिका इधर आती नाही’ असे उद्धट भाषेत त्यांना येथील कर्मचारी उत्तर देत होते. तुर्भे भागातील एका बड्या नेत्याने येथील कामाचे कंत्राट मिळविले आहे. ‘भाई को वर्षा से आशीर्वाद है, यहा कोई नही आयेगा’ अशा शब्दांत या ठिकाणी काम करणारे पर्यवेक्षक नागरिकांना उत्तर देत होते.

वाशीत मात्र दणके

सीवूड्स भागात स्फोटांच्या दणक्यांमुळे लगतच्या इमारतीचा मोठा भाग कोसळल्यामुळे प्रशासनाने घाईघाईने हे काम थांबविण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र दुसऱ्याच दिवशी शहरातील इतर उपनगरांमध्ये मात्र असे प्रकार नेहमीप्रमाणे सुरू होते. वाशी सेक्टर २ येथील मेघदूत मेघराज चित्रपटगृहाच्या ठिकाणी उभे राहात असलेल्या मॉलच्या बांधकाम ठिकाणी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाया खणण्यासाठी इतर दिवसांपेक्षा अधिक आवाजाचे स्फोट केले जात असल्याची माहिती या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी दिली.

हेही वाचा – चंद्रपूरमधील नाराज हंसराज अहीर यांच्या भूमिकेकडे लक्ष

शहराच्या एका भागात या स्फोटांमुळे इमारतीचा भाग कोसळताच बांधकाम थांबविले जाते. आमच्या भागातही इमारती कोसळून दुर्घटना होण्याची महापालिका वाट पाहात आहे का? पोलिसांकडे दाद मागावी तर ही यंत्रणा आमच्याकडे पाहायलादेखील तयार नसते. हे पाहिल्यास एका बिल्डरपुढे संपूर्ण यंत्रणा कशी झुकते हे पाहायला आम्हाला मिळत आहे. – जेम्स आवारे, रहिवासी, एस.एस.टाइप, सेक्टर २, वाशी

नवी मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या स्फोटांप्रकरणी सर्व बिल्डरांना हे प्रकार टाळण्यासाठी उपाय करण्याच्या सक्त लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी पूर्ण काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. – सोमनाथ केकाण, साहाय्यक संचालक, नगररचना, नमुंमपा