लोकसत्ता टीम

पनवेल: पनवेल शहरामध्ये चोरट्यांनी एकाच रात्री सात दुकानांचे शटर फोडले मात्र त्यांना एकाच दुकानात पंधरा हजार रुपयांची रोकड सापडली. चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकणच्या व्यापारी संकुलात चोरी केल्यामुळे दिवाळीपूर्वी पनवेलच्या व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे.

पनवेल शहरातील महापालिकेच्या कॉम्प्लेक्समधील सात दुकानांचे शटर चोरट्यांनी फोडले. मात्र यातील एकाच दुकानामध्ये चोरी झाल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिली. गुरुवारी रात्री दुकाने बंद करुन व्यापारी घरी गेले. शुक्रवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी व्यापारी दुकानांकडे परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसले. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानातील मुद्देमाल तपासल्यानंतर सात पैकी एकाच दुकानातून १५ हजार रुपये चोरीस गेल्याचे व्यापाऱ्यांना समजले. तोपर्यंत पनवेलच्या व्यापाऱ्यांमध्ये २० हून अधिक दुकाने चोरट्यांनी फोडल्याची अफवा शहरभर पसरली होती. चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर मध्यभागातून वर करुन ही चोरी केली आहे.

आणखी वाचा-अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; २०२२ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाची बजावणी ११ महिन्यांनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीसांनी श्वानपथकाच्या मदतीने चोरी झालेल्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातील अनेक दुकाने ही किराणा मालाची होती. तर एक साडीचे दुकान आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी पोलीस पथकाला नेमका किती मुद्देमाल गेला याची चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलीस गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारीपहाटेपर्यंत या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये संशयीतांचे चेहरे कैद झाले का? याची माहिती घेत आहेत.