लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. त्यामुळे शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. यात ११९५ शिक्षकांच्या केलेल्या चाचण्यांत  १७ शिक्षक बाधित आढळून आले आहेत.

आता पालिका प्रशासनाने वाढत्या करोना रुग्णांमुळे शाळा ३१  डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाचण्या थांबविण्यात आल्या असून शाळा सुरू करण्यापूर्वी पुन्हा शिक्षकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची जोरदार तयारी केली होती. खबरदारी घेत शहरातील पालिका तसेच खासगी शाळांचे र्निजतुकीकरण करण्यात येत होते.

शिक्षकाची करोना चाचणी बंधनकारक असल्याने चाचण्या करण्यास सुरुवात केली होती. पालिका व खासगी शाळांतील एकूण १ हजार १९५ शिक्षकांनी चाचण्या केल्या. त्यासाठी शहरातील ३० ठिकाणी चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये १७ शिक्षकांच्या चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद राहणार असल्या तरी नियमानुसार ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. पुन्हा शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच शिक्षकांच्या करोना चाचण्या  करण्यात येतील.

-योगेश कडुस्कर, शिक्षणाधिकारी, महापालिका