नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांतून भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणारे विजय नाहटा आणि विजय चौगुले यांना समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रिय झाला आहे. पक्षाच्या मंगळवारी पार पडलेल्या मेळाव्यात तसा सूर व्यक्त करण्यात आला. त्याचवेळी नाहटा आणि चौगुले यांच्या परतीचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, असे नवीन जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला चांगले यश मिळाल्याने पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातही महायुतीला १८ पैकी १६ जागा मिळाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुकांत महायुतीच वर्चस्व मिळवेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. नवी मुंबईत मात्र, शिंदे गटाला प्रमुख आव्हान भाजपचेच असेल, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी  पार पडला. त्यात महापालिका निवडणुकीची तयारी हा प्रमुख मुद्दा होताच; पण त्याबरोबरच पक्षातील बंडखोरांची ‘घरवापसी’ घडवून संघटनेला आणखी बळ देण्यावरही चर्चा झाली.

हेही वाचा >>> गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकीत बेलापूर येथून विजय नाहटा तर ऐरोलीतून विजय चौगुले यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंड पुकारले. त्यापैकी नाहटा यांनी महायुतीतून उमेदवारी न मिळण्याची शक्यता पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दार ठोठावले. त्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा असतानाच संदीप नाईक यांनी मागल्या दाराने पवार गटात प्रवेश करून उमेदवारीही पटकावली. मात्र, त्यानंतरही नाहटा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी खुलेपणाने तर काहींनी छुपा पाठिंबा दिला. आता त्यातील अनेक जण पक्षात परतण्यासाठी धडपडत असल्याचे समजते. वाशीतील मेळाव्यात बोलताना पक्षात असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडला. तर जिल्हाप्रमुख पाटकर यांनी ‘जे अन्य पक्षात गेले नसतील त्यांचे स्वागत आहे’, असे सांगून या पदाधिकाऱ्यांसाठी दारे खुली असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा >>> उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था

इच्छुकांना आवाहन

मेळाव्यात बोलताना पाटकर यांनी वाशी प्रभागातून मंदा म्हात्रे यांना आघाडी मिळवून दिली. त्यामुळे म्हात्रे यांचा विजय झाला, असा दावा केला. तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छाुकांनी आपली वैयक्तिक माहिती पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करूनही ज्यांनी अन्य पक्षाचे काम केलेले नाही त्यांची इच्छा असेल तर पक्षात स्वागत आहे. उपनेते विजय नाहटा आणि माजी जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. – किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐरोलीतील बंडखोरांचे समर्थक मेळाव्यात

बेलापूरमधून बंडखोरी करणाऱ्या नाहटा यांना साथ देणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचे निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाहीर करण्यात आले होते. खुद्द नाहटा यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांनी नेरुळ येथील सभेत जोरदार टीका केली होती. त्याचवेळी ऐरोलीतील बंडाबाबत शिंदे गटाची भूमिका मवाळ असल्याचे दिसून आले. तेथेेही चौगुले यांना शिंदे गटातून अनेक पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही; शिवाय त्यातील काही पदाधिकारी मेळाव्यातही हजर होते.