१२ हजार नावे घुसवण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप; सूचनांनंतर अंतिम यादी तयार करण्याचे पालिकेचे स्पष्टीकरण
संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई</strong> : प्रभाग आरक्षणावरील हरकतींचा घोळ संपत नाही तोच मतदार यांद्यांमधील घोळ समोर येऊ लागला आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुरवणी मतदार यादीत बोगस नावे घुसवली गेल्याचा आरोप केला आहे. या विरोधात शिवसेनेने उपोषणाचा इशाराही दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असून यासाठी प्रभाग आरक्षण व मतदार यादी प्रभागानुसार फोडण्याचे काम सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग आरक्षण व प्रारूप प्रभाग रचनेवर ५२४ हरकतींची नोंद करण्यात आली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण आहे तसे ठेवत प्रभाग रचनेतील सीमांमध्ये काही बदल केले. आता निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंतची यादी ग्राह्य़ धरली जाणार असून ती यादी पालिका प्रशासनाकडे देण्यात आली आहे. ही यादी १११ प्रभागांनुसार फोडण्याचे काम पालिका आयुक्त व पालिका निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिकेला प्राप्त झालेल्या मतदार यादीवर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या यादीत अनेक नावे नव्याने दिसत आहेत, मात्र ती नावे आमच्या प्रभागातील नाहीत. नावांमध्ये अनेक चुका असून मतदारांच्या नावापुढे दुसऱ्याचा फोटो दिसत आहे. त्यामुळे या यादीत बोगस नावे घुसविल्याचा संशय आहे. पुरवणी यादीमध्ये मोठय़ा प्रमाणात बोगस नावे घुसवली असून ती नावे रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे शिवराम पाटील यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाचे संतोष शेट्टी तसेच विविध प्रभागांतील राजकीय पदाधिकाऱ्यांनी या यादीवर संशय व्यक्त केला आहे. यावर पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मतदार यादीत काही चुका असतील वा चुकीची नावे असल्यास हरकती घ्याव्यात. हरकती, सूचनांनंतर मतदार यादी अंतिम करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रभागनिहाय याद्यांकडे लक्ष
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार केल्यानंतर ९ मार्च रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय आणि नवी मुंबई महापालिकेतील संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २३ मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. २४ मार्चला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
ऐरोली मतदारसंघात १२ ते १३ हजार बोगस नावे घुसवण्यात आली असून ही नावे वगळावीत, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा प्रकार करण्यात आला आहे. शिवसेना याविरोधात उपोषणाला बसणार आहे.
– विजय नाहटा, उपनेता, शिवसेना