नवी मुंबई : महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या नागरी कामांचे ठेके आपल्या निकटवर्तीय ठेकेदाराला मिळवून देऊन त्याचा मलिदा लाटणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये कंत्राटे पटकावण्यावरून होणारा सुप्त संघर्ष शुक्रवारी चव्हाटय़ावर आला. ऐरोलीतील काही कामांच्या ठेक्यावरून शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू कांबळे आणि भाजपचे पदाधिकारी राहुल शिंदे यांच्यात नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातच बाचाबाची झाली. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.गेल्या दीड वर्षांपासून निवडणुका लांबणीवर पडल्याने तसेच पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने नवी मुंबईतील आजी-माजी नगरसेवक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आपापल्या प्रभागांतील कामे आपल्या मर्जितील ठेकेदाराला मिळवून देऊन त्याद्वारे आर्थिक हेतू साध्य करण्याचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात. मात्र, करोना काळापासून ही स्पर्धा तीव्र झाली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी महापालिका मुख्यालयात आला. ऐरोलीतील काही नागरी कामांसाठी महापालिका प्रशासन निविदा प्रक्रिया राबवत आहे. ही कामे आपल्या पदरात पडावीत म्हणून विविध पक्षांचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. येथील भाजपचे पदाधिकारी राहुल शिंदे व माजी नगरसेवक जयाजी नाथ शुक्रवारी महापालिकेचे शहर अभियंता यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांची भेट घेऊन ते तेथून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू कांबळे आले. त्यांनी राहुल शिंदे यांना या कामांबाबत विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाले. हा वाद ऐवढा वाढला की शीवगाळ व धमकीपर्यंत गेला. त्यामुळे शहर अभियंत्यांनी वाद मिटविण्यासाठी राहुल शिंदे यांना दालनात बोलवून त्यांची समजूत काढली. राजू कांबळे ही तेथून निघून गेले.  मात्र राहुल शिंदे यांनी याबाबत थेट ‘एनआरआय’ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. 

या घटनेबाबत राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ऐरोली विभागातील कामांबाबत निविदा प्रक्रिया खुली असताना निविदा टाकण्यावरुन कांबळे यांनी मला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तर माजी नगरसेवक राजू कांबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

एनआरआयपोलीस ठाण्यात तक्रार

पालिका मुख्यालयात वाद झाल्यानंतर राहुल शिंदे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि जीवे ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आकाश मडवी, राजू कांबळे, अभय मडवी यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली आहे.