गेली १५ वर्षे एकत्रित सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजप यांच्यात दुफळी माजली आहे. उरण नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. निवडणूक प्रचारासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेऊन आपली ताकद दाखवली. त्यानंतर शिवसेनेने ‘सैराट’फेम आकाश ठोसर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनाच मैदानात उतरवून रॅली आणि सभा केली. राज्य आणि केंद्रात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या सेना-भाजप यांच्यात उरणमध्ये लागलेली चढाओढ प्रचारात रंग भरू लागली आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
नगरपालिका निवडणुकीत उच्च तंत्रज्ञानाचा वापर भाजपने केला आहे. मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेऊन पक्षाने आपले कसब दाखवले. जाहीर सभेच्या वेळी उरणच्या प्रत्येक नाक्यावर ‘डिजिटल स्क्रीन’ लावण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीयांना घरात बसून मुख्यमंत्र्यांची सभा ऐकता आली.
मोबाइलवरही मुख्यमंत्र्यांचे भाषण अनेकांनी ऑनलाइन ऐकले. प्रचारात जोमाने उतरलेल्या शिवसेनेने बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्याच ठिकाणी सभा घेतली. या सभेच्या पूर्वी मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी सभेत दिग्दर्शक महेश मांजरेकर सहभागी झाले होते.
‘सैराट’फेम आकाश ठोसर येणार म्हणून तरुण-तरुणांनी सभेला मोठी गर्दी केली होती. सभेसाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, उरणचे आमदार मनोहर भोईर तसेच सेनेचे इतर नेतेही उपस्थित होते. सभेत एकीकडे नेत्यांची भाषणे सुरू असताना महिला आणि तरुण ‘परशा’ची वाट पाहत उभे होते. आकाश ठोसरचे सभेच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर एकच गर्दी झाली होती. या वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. २०११ च्या निवडणुकीत सेना-भाजप युतीने खासदार हेमामालिनी यांची जाहीर सभा घेतली होती.
नोटावाटपाची शक्यता
नोटबंदीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला असून दैनंदिन गरजांची काटकसर करून जगावे लागत आहे. त्यातच रविवारी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांकडून मतदारांना वश करण्यासाठी नोट फॉर वोटची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळी चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजारांच्याच नोटांचे वाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत तीन ते चार कोटी रुपयांचा व्यवहार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच चलनात नसलेल्या नोटा असल्याने जादाचीही मागणी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत अनेक वसाहती, युवक, महिला मंडळ यांनी याद्याच सादर करून पक्ष आणि उमेदवारांकडून मतदानासाठी पैसे घेतले होते. प्रत्येक निवडणुकीत पैशांचे वाटप होऊ नये याकरिता निवडणूक आयोग पथके तयार करते. मात्र तरीही गल्लोगल्लीत पैसे वाटूनच मतदान करून घेत आहेत. २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत मताला ५०० रुपयांचा दर होता. या वेळी सुरुवात एक हजाराने होणार असल्याचे कार्यकर्त्यांने सांगितले.