नवी मुंबई : तुर्भे नाका फायजर कंपनी समोरील रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा एका एनएमएमटी इलेक्ट्रिक बस चालकाचे बसवरून अचानक नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
ही घटना गुरुवारी (३१ जुलै) रात्री ९:१० वाजता घडली. इंदिरानगर येथून निघालेली इलेक्ट्रिक बस (एमएच ४३ बीएक्स ०३९७) तुर्भे स्टोअरमार्गे वाशी रेल्वे स्थानकाकडे जात असताना चालकाचे बसच्या वेगावर असलेले नियंत्रण सुटले. यामुळे बस तुर्भे नाक्याजवळ फायजर कंपनीसमोरच्या वळणावर येताच चालकाचे बस वरून नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्यावरील गाड्यांना धडकली. यात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षांसह काही अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, बसच्या पुढील काचेचाही चक्काचूर झाला.
यात एनएमएमटी बस चालक प्रमोद रमेश कनोजिया (वय ४२, रा. नेरुळ) याला तुर्भे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे, इतरांच्या जीवितास धोका पोहोचवणे आणि सार्वजनिक रस्त्यावर इतरांचा जीव धोक्यात आणणे यासारख्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. या अपघातामुळे एनएमएमटीच्या बस देखभालीतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या प्रकरणी स्थानिकांकडून तुर्भे परिसरात पडलेल्या खड्ड्यांना दोषी ठरवले जात असून, रस्त्यावरील खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण होते. यातूनच गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याने अपघातातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासोबतच प्रशासनाकडून तुर्भे परिसरातील खड्ड्यांचा बंदोबस्तही करण्यात यावा अशी विनंती स्थानिकांकडून केली जात आहे.
“गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या एनएमएमटी बस अपघातानंतर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फिर्यादीसह एकूण पाच जण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच घडलेल्या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.” – आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे पोलीस ठाणे</p>