नवी मुंबई : वापरलेली वस्तू सेकंड हॅन्ड विकत घेणे देणे यासाठी ओ एल एक्स वेबसाईटचा वापर केला जातो. मात्र या माध्यमातून ओळख करून सोफासेट विकत घेण्याच्या बहाण्याने ११ लाख १३ हजार रुपयांची ऑन लाईन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरोळ येथे राहणारे ग्रॅव्हीन मेस्क्रेव्ह यांना घरातील सोफासेट विकण्याचा होता. यासाठी त्याची जाहिरात त्यांनी ओ एल एक्स यावर टाकली होती. ६ जून रोजी राजेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने त्यांना संपर्क करून सोफासेट आवडला असून विकत घेण्याचे असल्याचे सांगितले. सोफासेटची ठरलेली किंमत ऑन लाईन देण्याचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक कारणांनी पैसे जात नाहीत असा बहाणा करून मिश्रा याने स्वतःचा क्यूआर कोड फिर्यादी यांना पाठवला.
क्यूआर कोड स्कॅन करून १ रुपया पाठवा तो रुपया आला कि त्या खात्यावर सोफासेटचे पैसे पाठवतो असे सांगितल्याने फिर्यादी यांनी तसे केले. मात्र काही वेळातच फिर्यादी यांच्या खात्यातील ११ लाख १३ हजार ८४ रुपये मिश्रा याच्या खात्यात वळते झाले. हे लक्षात आल्यावर मिश्रा याला फिर्यादी यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद आला हि घटना ६ जून ते ७ जून दरम्यान घडली आहे. या प्रकरणी १२ तारखेला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.