पनवेल: आपले वाहन रस्त्याकडेला उभी करायचे असल्यास ते व्यवस्थित वाहनतळाच्या जागेवर आणि आपले वाहन लॉक झाले आहे का, किंवा आपण स्वताच आपल्या वाहनाची चावी विसरुन काही मिनिटांसाठी खरेदी करायला गेल्यास वाहनचोरट्यांना ही परिस्थिती आमंत्रण देणारी ठरते. पनवेलमध्ये अशीच घटना गुरुवारी घडली. औषधाच्या दूकानात अवघ्या ५ ते १० मिनिटांसाठी औषध खरेदी करण्यासाठी गेल्यावर परत येऊन वाहनमालक पाहतात तर काय दुचाकी गायब झाली. त्यामळे वाहनमालकांनी सतर्क रहावे अशी सूचना पोलीसांकडून केली जात आहे.
पनवेल येथे राहणारे ५० वर्षीय रमजान नावलेकर हे गुरुवारी औषध खरेदी करण्यासाठी भावाच्या मालकीची दुचाकी घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. येथील मॅक्सवेल मेडीकल या औषध दूकानासमोर रमजान यांनी दुचाकी उभी करुन औषध खरेदी केले. घाईगडबडीत रमजान हे दुचाकीला चावी विसरुन गेले होते. रमजान यांना औषध खरेदीसाठी अवघे ५ ते १० मिनिटे लागली. मात्र दुचाकीची चावी रमजान यांनी दुचाकीलाच विसरल्याने चोरट्याने अवघ्या १० मिनिटांत दुचाकी गायब केली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदविला आहे.