पनवेल – पनवेल महानगरपालिकेच्या तळोजा गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे रहिवाशांचे हाल सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. १०) संध्याकाळच्या सुमारास मन्नत आळी परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्याने भीषण हल्ला केला. ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.जखमी लहान मुलगा खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. काही क्षणांतच आणखी दोन कुत्रे त्याच्यावर तुटून पडले. या हल्ल्यात बालकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याच्या ओठ व नाक या भागांना विशेष इजा पोहोचली. मुलाच्या आरडाओरडीनंतर घरच्यांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली आणि तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील नायर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, जिथे सध्या प्लास्टिक सर्जरीसह उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर तळोजा आणि खारघर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. वारंवार होत असलेल्या अशा कुत्र्यांच्या हल्ल्यांवर पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अनेक तक्रारी दिल्यानंतरही उपाययोजना न झाल्याने नागरिक भयभीत असून, लहान मुलांना घराबाहेर सोडताना पालक घाबरत आहेत.
पनवेल महानगरपालिकेने गेल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने भटके कुत्रे आणि मांजरींचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. या सर्वेक्षणात सुमारे १९ हजार भटके कुत्रे असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी १३ हजार कुत्र्यांची फोटोसह माहिती महापालिकेकडे उपलब्ध आहे. पालिकेने ४० टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाल्याचा दावा मार्च महिन्यात केला होता; मात्र प्रत्यक्षात नियंत्रण अपुरे असल्याचे आता या घटनेवरून स्पष्ट होत आहे.घटनेनंतर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने संबंधित तीन कुत्र्यांना पकडून पोदी येथील निर्बिजीकरण केंद्रात १० दिवसांच्या निरीक्षणासाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पालिकेच्या माहितीनुसार, भटके कुत्रे व मांजरींच्या सर्वेक्षणासाठी सुमारे १९ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, दरवर्षी १ कोटी रुपये निर्बिजीकरण व लसीकरणासाठी राखीव ठेवले आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हे काम कंत्राटी संस्थेकडून करून घेतले जाते. एका निर्बिजीकरणासाठी केवळ १,६५० रुपये इतका दर ठरविल्याने मोठ्या संस्थांना ही जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचे सांगितले जाते. पनवेल महापालिकेने प्राण्यांसाठी फीरते दवाखाने आणि रेबीज क्लिनीक सुरू केले आहेत. या भीषण घटनेने पुन्हा एकदा पनवेल परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रहिवाशांनी बालकाच्या उपचाराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी आणि परिसरातील मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे. सध्या परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि प्रशासनाविषयी नाराजीचे वातावरण आहे.