नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पामबीच मार्गालगतच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर नागरिकांच्या पसंतीचे केंद्र आहे. या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात आबालवृद्धांची गर्दी पाहायला मिळते. विस्तीर्ण परिसराच्या नेरुळकडील मुख्य प्रवेशद्वार परिसरातील पथदिवे मात्र बंद असल्याने नागरिकांना येथे येण्यात अंधारामुळे अडचणी येत आहेत. पालिकेने याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत तसेच माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून नेरुळ पामबीच मार्गाला लागून असलेल्या १३७ एकरच्या भूखंडावर ज्वेल ऑफ नवी मुंबई विकसित केले आहे. यात ६४ एकर जागेवर होल्डिंग पॉन्ड तसेच ८ एकर जागेवर नैसर्गिक तलाव तसेच १४ एकरवर वॉकिंग ट्रॅक आणि याच परिसरात ३५ एकर जागेवर देशातील सर्वात मोठे मियावाकी जंगल उभे केले आहे. आधीपासूनच या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसराची नागरिकांना भुरळ असून सकाळी व संध्याकाळी या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
तरुणाईचीही या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु मागील काही दिवसांपासून ज्वेल ऑफ नवी मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील व परिसरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी डीपीएस तलाव तसेच टीएस चाणक्य परिसराबरोबरच ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही फ्लेमिंगोचा वावर पाहायला मिळाला होता. ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात नागरिकांची गर्दी होत असताना महापालिकेने पथदिव्यांबाबत योग्य ती काळजी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
सकाळी व संध्याकाळी या परिसरात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. कारण पथदिवे बंद असल्याने प्रवेशद्वाराकडील मुख्य रस्त्यावर सुसाट वाहने जातात त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. – गणपत शिंदे, नागरिक.
नवी मुंबईतील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसराबरोबरच मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील मुख्य रस्त्यावर पथदिवे बंद असतील तर तात्काळ त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल. – मिलिंद पवार, अभियंता, विद्युत विभाग, नवी मुंबई महापालिका.
