कारवाईवरील स्थगितीनंतर भाजपची माघार; आघाडी ठाम
नवी मुंबईतील गावठाणांतील प्रकल्पग्रस्तांच्या कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. यामुळे सोमवारच्या ‘नवी मुंबई बंद’मधून माघार घेत असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी स्पष्ट केले. मात्र, आघाडी आणि प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे ‘नवी मुंबई बंद’वरून राजकीय पक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे तोडण्यास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरुवात केली आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्या वेळी आयुक्तांनी कारवाईवर ठाम असल्याचे सांगितले. या कारवाईविरोधात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सोमवारी ‘नवी मुंबई बंद’ची हाक दिली होती. मात्र, रविवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पावसाळ्यापुरती कारवाईला स्थगिती मिळवली. यामुळे सोमवारी होणाऱ्या बंदमधून माघार घेत असल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी सानपाडा येथील पत्रकार परिषदेत दिली. मात्र, ‘नवी मुंबई बंद’च्या भूमिकेवर ठाम असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी व प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे.
या बंदची तयारी झाली असून, अचानक बंद मागे घेतला जाणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे लेखी पत्र दाखवण्याची मागणी करीत आघाडीच्या नेत्यांनी माघार घेण्यास विरोध दर्शवला. यामुळे सोमवारच्या ‘नवी मुंबई बंद’मध्ये भाजप सहभागी होणार नसला तरी आघाडीबरोबरच प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत.