राज्यभरातून येणाऱ्यांचा नवी मुंबईतून मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज, बुधवारी आझाद मैदानात येणाऱ्या मराठा क्रांती मोच्र्यामुळे एकीकडे मुंबईतील रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत असतानाच, मोर्च्याचा फटका उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनाही बसण्याची चिन्हे आहेत. या मोर्च्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांनी त्यांची वाहने नवी मुंबईतील स्थानकांच्या आवारात तसेच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभी करून पुढील प्रवास रेल्वेने करावा, असे नियोजित करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी हार्बर तसेच मध्य रेल्वेवरील लोकलगाड्यांना प्रचंड गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत.

भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार असला तरी राज्यभरातून हजारो मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षणीय राहणार आहे. या मोर्चेकऱ्यांची वाहने थेट मुंबईकडे गेल्यास मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाशी येथील एपीएमसीच्या आवारात मोर्चेकऱ्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पनवेल ते वाशी दरम्यानच्या रेल्वे स्थानकांबाहेर असलेल्या मोकळ्या जागा तसेच मैदाने येथे वाहने उभी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहने येथे उभी करून मोर्चेकऱ्यांनी हार्बर रेल्वे मार्गाने रे रोडपर्यंत प्रवास करणे अपेक्षित आहे. साहजिकच एरवी नेहमीच सकाळी प्रवाशांनी भरून वाहणाऱ्या हार्बर तसेच मध्य रेल्वेगाडय़ांना बुधवारी नेहमीपेक्षा अधिक गर्दी उसळणार आहे. नियमित प्रवाशांना याचा फटका बसू नये, यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त लोकलगाडय़ा सोडण्याचे जाहीर केले आहे. परंतु याचा प्रत्यक्ष कितपत फायदा होईल, याबाबत साशंकता आहे.

मध्य रेल्वेच्या जादा गाडय़ा

* मराठा मोर्चा संपल्यावर मोर्चाला आलेल्या मुंबई व मुंबईबाहेरील मराठा समाजातील नागरिकांना परतण्यासाठी गैरसोय होऊ  नये म्हणून मध्य रेल्वेकडून जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहेत.

* लांब पल्ल्यांच्या सात गाडय़ांना एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) टर्मिनससाठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, मुलुंड, कुर्ला, वडाळा, बेलापूर, वाशी या स्थानकांमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक

* महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त तिकीट बुकिंग खिडकीची व्यवस्था

लांब पल्ल्याच्या गाडय़ांना अतिरिक्त डबा

* दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस

* नागपूर-नंदीग्राम एक्स्प्रेस

* महालक्ष्मी एक्स्प्रेस

* चेन्नई मेल

* सिकंदराबाद-देवगिरी एक्स्प्रेस

* मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

* कन्याकुमारी एक्स्प्रेस

* हैद्राबाद-हुसेननगर एक्स्प्रेस

* लो. टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या शालिमार एक्स्प्रेस व अमरावती वर्धा पॅसेंजर या गाडय़ांनाही अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीद्वारे लक्ष

दक्षिण व मध्य प्रादेशिक विभागातील सर्वच शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सकाळी सात वाजल्यापासून मोर्चा, मोर्चाच्या आधीच्या व नंतरच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. मध्य व दक्षिण प्रादेशिक विभागातील सुमारे २५ पोलीस ठाण्यांमधले ५० अधिकारी, कर्मचारी मोर्चाचे लाइव्ह चित्रीकरण करणार आहेत.

मैदानाचे दार विस्तारले

भायखळ्याहून आझाद मैदानापर्यंत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. त्याचप्रमाणे मोर्चाच्या मार्गावर तात्पुरती शौचालये व पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे.

मोर्चाला ‘शिववडा’

मराठा  ठाणे जिल्ह्य़ातून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला पडद्यामागून मदत करणाऱ्या शिवसेनेने यंदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात थेट उडी घेतली आहे. मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येऊ घातलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून पक्षातर्फे न्याहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suburban train may hit by maratha kranti morcha
First published on: 09-08-2017 at 04:11 IST