नवी मुंबई : वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वाद शमले नसतानाच आता त्यांच्या आईचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रबाळे पोलिसांनी दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी उघड अरेरवी केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्थानकात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
शनिवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास ऐरोली हद्दीतील सिग्नलवर तुर्भे एमआयडीसी परिसरातील प्रल्हाद कुमार (वय २२) नावाचा तरुण मिक्सर ट्रक घेऊन जात असताना, त्याच्या ट्रकचा धक्का पुणे नोंदणीच्या कारला (एमएच-१२ आरटी ५०००) लागला. या अपघातानंतर कारमधील दोन जणांनी कुमारला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्या कारचा मागोवा घेत पुण्यापर्यंत धाव घेतली असता, तेथे ही कार वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी पोलीस स्थानक हद्दीतील घरी आढळली. पोलिसांनी तिथून अपहरण झालेल्या चालकाची सुखरूप सुटका केली. मात्र, या कारवाईदरम्यान पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी दरवाजा न उघडता अरेरवी करत हुज्जत घातल्याने हे प्रकरण अधिक चिघळले. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रबाळे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे.
जुने वाद पुन्हा चर्चेत
पूजा खेडकर यांच्या आई म्हणजेच मनोरमा खेडकर यांचे वादग्रस्त वर्तन हे नवे नाही. या पूर्वी पुण्यातील चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व घराचा ताबा मिळवण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी अनेक वेळा शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मटपणे वागल्याच्या तक्रारीदेखील नोंदविल्या गेल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्या वर्तनामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याचे आरोप शेजाऱ्यांनी केले होते.
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर स्वतःही निलंबनानंतर चर्चेत असतानाच त्यांच्या आईचे असे कृत्य उघड झाल्याने पुन्हा एकदा खेडकर कुटुंबीय चर्चेत आले आहेत. सदर प्रकरणी खेडकर यांचा काही संबंध आहे का? ही कार खेडकर यांच्या घरी कशी आली? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत. या प्रकरणाचा तपास रबाळे पोलिस करत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातून कोणती अधिक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.